अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

महाराष्ट्रातील कहानी में ट्विस्ट!

हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

‘आपल्या ऑनलाइन भाषणात उद्धवजींनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे उद्धवजींना सहानुभूती मिळेल अशी शक्यता वाटल्यामुळे, भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याऐवजी, शिंदे यांना मुख्यमंत्री करावं असा विचार झाला असू शकतो.‘

शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे संतापलेले शिवसैनिक भाजप आणि शिंदे गटाच्या जवळ येतील, असा भाजपचा हिशेब दिसत आहे. आपणच किंगमेकर आहोत, असं अप्रत्यक्षपणे देवेंद्रजींनी दर्शवलं होतं. परंतु भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याचे जाहीर आदेश देऊन काँग्रेसमध्येच नाही तर भाजपमध्येही हायकमांड संस्कृती आहे, हे दिसल्यामुळे देवेंद्रजींना ‘जोर का झटका धीरे से’ बसला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आणि राज्याच्या विकासाचं स्वप्न उरी बाळगून, मला वाटचाल करायची आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाची शपथ घेताना काढले. ते मुख्यमंत्री होताच, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. तेव्हा उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला याचं आम्हालाही दुःख होतं. परंतु हिंदुत्वाच्या विचारसरणीबाबत आम्ही तडजोड करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली. १९७८ मध्ये शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यावेळी त्यांनी जनता पक्ष, शे. का. पक्ष वगैरेंसमवेत पुलोद सरकार स्थापन केलं होतं. जनता पक्षात जनसंघदेखील होता. त्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि उपमुख्यमंत्री नासिकराव तिरपुडे हे वसंतदादांना रोजच्या रोज पीडत होते. हा जाच सहन होत नसल्यामुळेच यशवंतराव चव्हाण यांना सर्व माहिती देऊनच बंड केले, असा खुलासा अनेक वर्षांनी पवार यांनी केला. शिंदे यांनीही शिवसेना पक्षप्रमुखांशी गद्दारी केली, असा आरोप झाला तेव्हा त्यांनी, हे भांडण तत्त्वांचं होतं, असं सांगून आपल्याबरोबर ३९ आमदार असल्याचा दावा केला. आपण बंड वगैरे काहीही केलं नसून, आपलीच शिवसेना खरी असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला आहे. शिंदे हे मुख्यमंत्री होतील, असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु हे काही दिवसांपूर्वीच ठरलं होतं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पट्टशिष्य गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मात्र यात तसं कोणतंही तथ्य नाही. याचं कारण, सुभाष देशमुख, गणेश नाईक, अतुल भातखळकर आणि २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे वैयक्तिक सहायक असलेले व आज आमदार बनलेले अभिमन्यू पवार यांनी देवेंद्र यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्र जबरदस्त गतीने प्रगती करेल, अशी आशा न्यायालयातील निकालानंतर व्यक्त केली होती.

आपल्या ऑनलाइन भाषणात उद्धवजींनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे उद्धवजींना सहानुभूती मिळेल अशी शक्यता वाटल्यामुळे, भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याऐवजी, शिंदे यांना मुख्यमंत्री करावं असा विचार झाला असू शकतो. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यामुळे संतापलेले शिवसैनिक हळूहळू शांत होतील आणि तेदेखील भाजप व शिंदे गटाच्या जवळ येतील, असा एकूण हिशेब आहे. शिवसेनेचा विधिमंडळातला बहुमताचा गट हा आपल्याकडे असून त्यामुळे उरलेल्या सोळा आमदारांना आपला निर्णय मान्य करावा लागेल, असं बंडखोर गटाकडून सांगण्यात येत आहे. एकेकाळी बंडू शिंगरे यांनी बंड करून प्रतिशिवसेना स्थापन केली होती. परंतु शिंदे यांनी आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचं चित्र निर्माण केलं आहे. शिवसेनेचं नेतृत्वच उद्धवजींकडून हिसकावून ठाकरेमुक्त शिवसेना करण्याचा हा उघड उघड प्रयत्न आहे. सत्ता हाती असल्यामुळे ठाणे जिल्ह्यापलीकडे प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे यांच्याकडून होईल. परंतु घराणेशाहीवर आधारलेला पक्ष घराणेशाहीमुक्त करणं, फार कठीण असतं. शिवाय शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत हे दोन वेळा खासदार म्हणून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यामुळे शिंदेशाहीतही घराणेशाही आहेच. भाजपमध्ये घराणेशाहीची अनेक उदाहरणं आहेत.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मी सहभागी होणार नाही, पण सरकार चालवण्याची जबाबदारी माझी असेल असं सांगत, आपल्याकडे रिमोट कंट्रोल आहे आणि आपणच किंगमेकर आहोत, असं अप्रत्यक्षपणे देवेंद्रजींनी दर्शवलं होतं. परंतु भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी होण्याचे जाहीर आदेश देऊन त्यांना जागा दाखवून दिली. काँग्रेसमध्येच हायकमांड संस्कृती आहे, अशी टीका करणार्‍या फडणवीस यांना भाजपमधल्या याच प्रकारच्या संस्कृतीचा अनुभव आला. त्यामुळे देवेंद्रजींना ‘जोर का झटका धीरे से’ बसला.
(पूर्वार्ध)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये