कल तेरा घमंड टुटेगा !

उद्धव आज तुने मेरा घर तोडा है , कल तेरा घमंड टुटेगा !
या शीर्षकातील वाक्य प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावत हिचं आहे आणि त्यातील एक न एक शब्द आज खरा झाला आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शिवसेना पक्षातील आमदार , खासदार , मंत्री आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी संपूर्ण पक्षच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हवाली केला होता. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या पन्नास आमदारांनी व मंत्र्यांनी एका रात्रीत शिवसेनेचा पालापाचोळा केला नसून याची कल्पना ते सतत मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देत होते, पण तुम्ही मात्र कुटुंबप्रेमातून विशेषतः किचन कॅबिनेटमध्ये इतके व्यग्र तर होताच, शिवाय तुमचे तोंड सदैव भिंतीसमोर असायचे, त्यामुळे हे सर्व सत्तेच महाभारत घडलं आहे. परिणामी कंगना राणावतचा शब्द अन्् शब्द आणि त्याचा आशय खरा ठरला आहे.
उद्धव ठाकरे आपण स्वत: मुख्यमंत्री व आपले युवराज पुत्र मंत्रिमंडळात बलस्थानी असलेले अधिकृत दर्जा नसलेले दुसरे उपमुख्यमंत्री याचा अर्थ तुम्ही जातिवंत शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून पुत्रप्रेमापोटी राजकीय घराणेशाही राबविली आणि उरलंसुरलं काम आपले विश्वप्रवक्ते खासदार संजय राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, माजी बिनकामाचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, सचिव, माजी परिवहनमंत्री अनिल परब, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत आदी नेत्यांना आंदण म्हणून दिल्यानंतर दुसरं काय होणार? जर दुकानाचा मालकच गल्ल्यावर नसेल तर घरगडी दोन्ही हाताने ओरबाडणारच, अशी आपली अवस्था झाली होती. अर्थात, आपणास मुख्यमंत्री झाल्याचा इतका दर्प झाला होता, त्यामुळे हा दर्प कंगना राणावतच्या भाषेत घमेंडीत कधी बदलला, हे तुम्हाला कळलेच नाही. बारा-तेरा कोटी महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरून तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा कारभार शासकीय वर्षा बंगल्यावर बसून करू लागला.
कारण लालफितीच्या कारभारात तुमच्या मंत्रीपुत्राचा हस्तक्षेप तर होताच, शिवाय तुमच्या धर्मपत्नी सौ. रश्मीताई ठाकरे यांचासुद्धा वाढता हस्तक्षेप होता, हे आता हळूहळू उघड होऊ लागले आहे, त्यात तुमच्या किचन कॅबिनेटचा मुजोरपणा याला तुमच्याच पक्षातील मंत्री वैतागून गेले होते. कारण त्यांना तुमची भेट घेण्यासाठी तासन््तास ताटकळत ठेवण्यात हे कॅबिनेट वाकबगार होते. त्यामुळे अनेक मंत्री कंटाळून वर्षाच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असायचे, पण हे वास्तव मुख्यमंत्री म्हणून धड तुम्हाला दिसले ना काही विकाऊ पत्रकारिता करणाऱ्यांना दिसले. कारण हे सगळेच खासदार संजय राऊत यांनी माल मोजून कधीच खिशात घातले होते . ‘कोंबडं कितीही झाकलं तरी उजडायचं थाबंत नाही’ अगदी तसाच प्रकार तुमच्याबाबतीत तुम्ही स्वत: संयमी असून घडला, याचं मनस्वी वाईट वाटतं, पण एकटा राजा संयमी असून चालत नाही तर त्या राजाचं अष्टप्रधान मंडळ तितकंच संयमी असावं लागतं, अन्यथा छत्रपती शिवाजीमहाराज यांची कामगिरी अटकेपार गेली नसती.
आता झालं ते पुरेसं आहे, असं समजून उमजून महाराष्ट्रहितासाठी टोमणेबाजी न करता चापलूस अष्टप्रधान मंडळाला बाजूला करून आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवारसाहेब यांची शिकवणी बंद करून कामाला लागा अन्यथा छप्पन्न वर्षे पूर्ण झालेल्या शिवसेनेला अबतक छप्पन्न म्हणायची वेळ येईल, शिवसेना हिंदू संघटना ही तुमची वडिलोपार्जित संघटना आहे. ती पायाभरणी तुम्ही केली नाही, तिची पाळेमुळे लोकांच्या मनामनात रुजली आहेत. ही पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, कारण शिवसेना ही तुमची व्यक्तिगत मालमत्ता नाही व नव्हती, त्यासाठी (स्व.) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रात्रीचा दिवस केला आहे. परिणामी सध्याच्या तुमच्या अष्टप्रधान मंडळातील कथित सेनापतींना घरचा रस्ता दाखवला, तरच शिवसेना ज्वलंत आणि जिवंत राहील. कारण अशाच चापलुसी करणाऱ्या अष्टप्रधान मंडळामुळे अनेक राजकीय पक्ष , राजकीय घराणी आणि नेतेमंडळी देशोधडीला लागली आहेत, हे विसरू नका. कारण त्यामागे पैशाचा माज आणि घमेंड हे घटक महत्त्वाचे होते.