राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

पायी वारी म्हणजे चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ आध्यात्मिक उत्सव

प्रा. डॉ. एस. एन. पठाण, माजी कुलगुरू

‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती॥ भक्ती हे सोपे वर्म असल्याचे सांगतात, परंतु लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी सुळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात. भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार, विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते.

पायी वारीला आज प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांबरोबर आज लाखो वारकरी पंढरपूरला पायी जात आहेत. रस्त्यात या वारकर्‍यांची शिस्त, विठ्ठलाच्या प्रती असणारा त्यांचा निष्काम भाव, मुखी नाम, ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करीत विठ्ठलाच्या भेटीची लागलेली ओढ हे सर्व पाहणेदेखील अत्यंत पुण्यशील कर्म समजले जाते. असा हा वारकरी मात्र ग्रामीण भागातील शेतकरी, कामकरी, शेतमजूर व सामान्य नागरिक असतो. या सामान्य वारकर्‍यांच्या चित्तशुद्धीचा व निष्काम कर्माचा विज्ञाननिष्ठ प्रयोग संत तुकाराम महाराजांनी भक्तीच्या मार्गे जनतेला दिला आहे व त्याचा आता आषाढी एकादशीनिमित्ताने आध्यात्मिक उत्सव सुरू आहे.

तुकोबांनी सर्वांनाच भक्तीचा अधिकार असल्याची घोषणा केली. ‘सकळांसी येथे आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरिच्या नामे॥’ असे भक्तीचे स्वरूपही आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. तुकोबांनी केवळ भक्तीचाच डांगोरा पिटला आणि कर्माला दांडी मारली असे नाही. तुकोबांनी भक्ती हे निष्काम कर्माचेच एक अंग मानले. कर्म आणि भक्तीची सांगड घातली. कर्म करीत असतानाच भक्तीचा आनंद लुटता येतो. भक्ती ही अज्ञातवासात किंवा एकांतात किंवा डोंगरदर्‍यात किंवा देवळातच केली पाहिजे, असे आवश्यक नाही. कर्म करताना कोणत्याही स्थळीकाळी भक्ती करता येते. भक्तीमुळे निष्काम कर्मही करता येते, माणसाच्या चित्तवृत्ती शुद्ध झाल्या की, कर्म हे कर्तव्य म्हणून करणे शक्य होते. कर्माला कर्तव्य मानले की, कर्माच्या फलाची आशाही सुटते. फलाची चिंता मिटते. भक्तीचा संबंध हा मनुष्याच्या मनोपिंडाशी असतो. भक्तीच्या माध्यमाने भक्त हा देवरूप होतो. अशीच माणसे समाजाच्याही उद्धाराचे काम करतात. भक्तीची प्रक्रिया ही विज्ञाननिष्ठ प्रक्रिया असून, समाजाच्या चित्तशुद्धीचा इहवादी कार्यक्रम म्हणून तुकोबांनी भक्तिमार्ग समाजासमोर मांडला होता. स्वतःच्या अनुभवाने तुकोबांनी तो सिद्धही केला. भक्तीचा आणि मनाचा संबंध असतो म्हणून मनावर भाष्य करताना तुकोबा म्हणतात, ‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धीचे कारण॥
तुकोबांनी नवविधा भक्तीचेही स्वरूप स्पष्ट केलेले आहे. पूर्वसुरींच्या संतांनीही नवविधा भक्तियोगाचे प्रतिपादन केले होते. नवविधा भक्तियोग पूर्णपणे व्यावहारिक पातळीवर आणण्याचे श्रेय मात्र तुकोबांनाच दिले पाहिजे. ज्याचे नामस्मरणात चित्त जडलेले आहे अशाच लोकांचे अंकित व्हावे, दास व्हावे, असे तुकोबांना वाटते. ज्याला नवविधा भक्ती करता येते त्याचेच अंतःकरण शुद्ध होते. चित्तवृत्ती प्रसन्न आणि आनंदित होतात. जीवनातले परमोच्च असे भक्तिसुखही त्याला प्राप्त होते.

देवाचे स्मरण, नामसंकीर्तन, श्रवण, नामोच्चार, अहंकारनिरसन, मनीमानसी पूजन, दास्यभाव, आत्मसमर्पण, सख्यभाव अशी ही नवलक्षणांनी युक्त असलेली भक्ती म्हणजे नवविधा भक्ती होय. हाच भक्तियोग वारीत साधला जातो. नवविधा भक्ती जो जाणतो आणि साक्षात या नवलक्षणांनी युक्त अशी भक्ती करतो, तोच खरा भक्त आणि देव होय. भक्तीचा भौतिक प्रभाव मांडतानाही तुकोबा विज्ञानाचा आधार घेऊन, भक्तिमार्ग हा पूर्णपणे वैज्ञानिक असल्याचे सांगतात. ‘नाम घेता कंठ शीतळ शरीर। इंद्रिया व्यापार नाठवती॥ भक्ती हे सोपे वर्म असल्याचे सांगतात, परंतु लगेच तुकोबा भक्ती ही अत्यंत कठीण अशी सूळावरची पोळी असल्याचेही प्रतिपादन करतात. भक्तीसाठी मनाचा कठोर निर्धार आवश्यक असतो आणि सर्व विकार, विकृतींचाही त्याग करावा लागतो. शुद्ध अंतःकरणानेच भक्तीच्या समाधीकडे प्रवास करणे शक्य असते. संतांनी भक्तिमार्ग आणि एकेश्वर विठ्ठलाचे निर्गुण ध्यानरूप समाजाच्या पारलौकिक कल्याणासाठी सांगितले होते. समाजाला भक्तिमार्गी करून, समाजाचे चित्त शुद्ध करून समाजात समत्व ममत्व निर्माण करण्याचा इहवादी कार्यक्रम संतांनी राबविला.

आजचा काळ हा ग्लोब व्हिलेजच्या प्रगतीचा कालखंड आहे, परंतु एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकातील प्रगतीच्या याच कालखंडात धार्मिक उन्मादाने केवळ भारतातच नव्हे तर जगभर हैदोस घातल्याचे दिसून येते. धर्म आणि भाषेच्या प्रश्नांपेक्षा रोजच्या जगण्याचे प्रश्न त्याला भेडसावीत आहेत. रात्रंदिन तो जगण्याशी झुंजत आहे. एकूण आपल्या भारतीय समाजात सध्या सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेचा प्रश्न मूलभूत बनलेला आहे.

संतांनी आपल्या काळात सर्वधर्मसमभाव आणि सांप्रदायिक एकता निर्माण करून; समाजाला जगण्याचा अहिंसात्मक शांततावादी मार्ग सांगितला होता. संतांनी अनुभवाने आपल्या विचारांचे प्रतिपादन केले होते. ‘नाही आले अनुभवा कैसे नाचू मी देवा’, ही संतांची जगण्याची आणि उपदेश करण्याची पद्धती होती.

संतांचा विचार हा विवेकवादी, विज्ञाननिष्ठ आणि सर्वधर्मसमभावात्मक मानवतावादी विचार आहे. सांप्रदायिक सद्भाव आणि सामाजिक शांततेच्या जगण्याचे मौलिक तत्त्वज्ञान आहे. आजच्या या सांप्रदायिक अशांतता आणि दहशतवादाच्या विषाणुयुक्त भूमीवर संतविचारांची आणि संतमार्गाची पेरणी केल्यानेच जगात विश्वशांती आणि सद्भाव निर्माण होऊ शकेल. हाच मंत्र गेली ३० वर्षे विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड राबवित आहेत. दिंड्यांमधील पायी चालणारे वारकरी वाखरी तळावर पोहोचले की, वारकर्‍यांना विसावा हवा असतो. म्हणून प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सरांनी वाखरी येथे अत्यंत सुंदर विश्वशांती गुरुकुल स्थापन केले. वारकर्‍यांसाठी २०० स्वच्छतागृहे उपलब्ध करून दिली. येथे एक विशेष भव्य स्वागत कमान उभारून व्यासपीठावर प्रा. डॉ. कराड सर प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत वारकर्‍यांचे स्वागत करतात. जवळजवळ १ लाख वारकर्‍यांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात येते. येणार्‍या प्रत्येक दिंडीप्रमुखाचे, तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन येणार्‍या महिला वारकर्‍यांचा शाल, पुष्पहार देऊन प्रा. डॉ. विश्वनाथ कराड स्वागत करतात. असा हा पायी चालणार्‍या वारकर्‍यांच्या चित्तशुद्धीचा विज्ञाननिष्ठ कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. जणू तो आध्यात्मिक उत्सवच असतो.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये