राज्यातील ‘या’ भागात रेड अलर्ट, 5 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई | सध्या राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह, विदर्भातील काही भागांतही पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबईसह कोकणातही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरु असून पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे.
महाराष्ट्रात पुढील 5 दिवसांत तीव्र हवामानाचा आणि पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांसह नदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील ४ ते ५ दिवस राज्यात सगळीकडे पावसाची शक्यता असून कोकण, मध्य महाराष्ट्रासह इतर भागातही अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, हवामान खात्याने कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याला रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, या भागात आपत्ती व्यवस्थापन विभागसह प्रशासन सज्ज झाले आहे. या परिसरात एनडीआरएच्या तुकड्या देखील मागवण्यात आल्या आहेत.