राज्यात पावसाचा जोर कायम, ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट

मुंबई | Maharashtra Rain Updates – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तसंच येत्या दोन दिवसांमध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.
पुणे जिल्ह्यात पुढील 48 तासात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसंच मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळा बंद राहणार आहेत. पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे आज दुपारपासून उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे.
दरम्यान, पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमधील शाळा उद्याही (14 जुलै) बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.