कोरोनानंतर मुलांचा बौद्धिक विकास

अशोक सोनवणे, सायकोलॉजिस्ट तथा ब्रेन प्रोग्रामिंग ट्रेनर
कोणत्याही मुलांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास हा मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्यातून होत असतो. जेव्हा मुलांना नवनवीन अनुभव भेटतात आणि त्या अनुभवांना मूल कसे प्रतिसाद देते यावर मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्या होणे अवलंबून असते. परंतु ज्या मुलांच्या मेंदूमधील न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात ते मूल अधिक बुद्धिवंत असते. मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्याचा वेग हा लहानपणी जास्त असतो. त्यामुळे पालकांनी येथे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
जेव्हा मूल नवीन काही पाहते, ऐकते, समजून घेते, नवीन कृती करण्याचा प्रयत्न करते, नवीन कृतीला प्रतिसाद देते, प्रतिसाद देताना मुलांची जिज्ञासा, इच्छाशक्ती, गरज, आवड, समज आणि प्रेरणा जितके जास्त तितक्या न्यूरॉन्सच्या जोडण्या जास्त होतात. लहान मुलांचा ८३% बौद्धिक विकास हा सभोवतालच्या वातावरणातून होत असतो. मानवी मेंदू सभोवतालच्या वातावरणातूनच विकसित होत असतो. मग एक पालक म्हणून आपण आपल्या मुलांना असे अनुकूल वातावरण पुरवित आहोत का? मुलांचे शिक्षक, बालसवंगडी, टिचिंग-लर्निंग प्रोसेस, शालेय वातावरण या सर्व वातावरणात मुलांना भेटणारा साद, मुलाकडून दिला जाणारा प्रतिसाद, शाळेच्या तयारीपासून ते शाळेत जाताना येतानाचे अनेक अनुभव, इतकेच नव्हे तर या सर्व बाबीमध्ये मुलांचे निरीक्षण, संभाषण, वैचारिक प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, तुलना आणि यामधून निर्माण होणारी प्रेरणा यामधून मेंदूचे अनेक कप्पे ओपन होतात आणि त्यामधूनच बौद्धिक विकास होत असतो.
परंतु कोरोनामुळे आपली मुलं शिक्षक, शाळा, बालसवंगडी आणि शालेय वातावरणातील अनेक अनुभवापासून वंचित राहिलेले आहे. मुलांना आळस आणि मोबाइलची सवय कमीअधिक प्रमाणात लागलेली आहे. या सर्व परिस्थितीचा आपल्या मुलांच्या मेंदूच्या विकासावर म्हणजेच बौद्धिक विकासावर प्रतिकूल परिणाम पडलेला आहे. मग यापुढे, बौद्धिक विकासाला पोषक वातावरण अधिक कसे द्यावे, झालेली झीज कशी भरून काढावी? याकरिता पालक म्हणून काय करावे हे माहिती असले पाहिजे. शांततेच्या काळात जी मुलं आणि पालक अधिक प्रयत्न करतात तेच संघर्षमय काळात अधिक सक्षमपणे उभे राहतात. याकरिता प्रत्येक कुटुंबात प्रत्येक पालकांना चाइल्ड सायकोलॉजी आणि ब्रेन सायन्स याबाबत माहिती असली पाहिजे. फक्त माहितीच नव्हे तर प्रत्येक कुटुंबात चाइल्ड सायकोलॉजिस्ट तयार झाले पाहिजेत.