मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला! मुख्यमंत्र्यांकडून गायक भूपिंदर सिंह यांना श्रद्धांजली

मुंबई : (CM Eknath Shinde tribute to singer Bhupinder Singh) बॉलिवूडमधील अनेक गाण्यांसाठी ओळखले जाणारे भूपिंदर सिंग यांनी सोमवारी दि. 18 रोजी संध्याकाळी 7:45 वाजता मुंबईतील अंधेरी येथील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना ‘आपल्या भावस्पर्शी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक भूपिंदर सिंह यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
लोकांच्या ‘मनाचा ठाव घेणाऱ्या आपल्या आवाजाने भूपिंदर सिंह यांनी अनेक गझल अजरामर केल्या. त्यांचा धीरगंभीर आणि भावस्पर्शी आवाज रसिकांच्या मनात कायम स्वरुपी रुंजी घालत राहील. ज्येष्ठ गायक, गझलकार भुपिंदर सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे मुख्यमंत्र्यांनी शोक संदेशात म्हटलं आहे.
त्यांच्या पत्नी मिताली यांनी ते काही दिवसांपासून आरोग्याच्या अनेक समस्यांनी त्रस्त होते. यामध्ये यूरिनरी समस्यांचाही समावेश होता, अशी माहिती दिली आहे. 82 वर्षीय गायक भूपिंदर सिंग यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.