“सगळ्यांनाच कुठे तुमच्यासारख्या पायघड्या…”, किशोरी पेडणेकरांचा रामदास कदमांवर निशाणा

मुंबई | Kishori Pednekar On Ramdas Kadam – शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसंच ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. “दोन दिवसांपूर्वी रामदास कदम पोरं कुठं जायची ती जाऊदे, मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील म्हणत होते. आज तेच मातोश्रीसह उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंवर चिखलफेक करत आहेत,” असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “प्रत्येक शिवसैनिक रामदास कदम यांना भाई म्हणत असे. ज्या दिवसापासून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून ते पक्षाच्या मोठ्या पदावरच राहिले. 20 वर्षे आमदारकी भेटली. मुलाला आमदारकी, त्यांना विधान परिषद मिळाली. शिवसेनेमधून ते निवडून गेले. असं असताना ते मधल्या काळात बरं नाही, बरं नाही या सबबीखाली लोकांपासून दूर राहायला लागले. मी त्यांच्या दोन्ही मुलांना बाबा कसे आहेत? आमदार कोण आहे असे प्रश्न विचारायचे.”
“जेव्हा जेव्हा आम्ही गोरेगावला गेलो तेव्हा तेव्हा रामदास कदम यांना भेटायला गेलो. मात्र, रामदास कदम यांच्यातील ‘भाई’ने या वयात काय केलं? दोन दिवसांपूर्वी म्हणाले मी मरेपर्यंत शिवसेनेतच राहील. पोरं कुठे जायची ती जाऊदे, पण मी शिवसेनेतच राहील असं म्हणत होते,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
पुढे किशोरी पेडणेकरम्हणाल्या, “आम्ही कोणाचा आदर्श ठेवायचा? निष्ठावंत म्हणून कुणाकडे बघायचं? शिवसेना सोडून जायचं असेल तर नक्की जा, पण ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी पदं दिली, त्याचा मान ठेवा. शिवसेनेत सगळेच राबतात, सगळ्यांना कुठे आमदारकी मिळते. सगळ्यांनाच कुठे तुमच्यासारख्या पायघड्या घातल्या जातात.”