भाजपचं मिशन कोकण: मशागतीला सुरुवात!
मुंबई : (BJP in campaign kokan) एकनाथ शिंदे यांच्या ना भुतो, ना भविष्य अशा बंडखोरीमुळं महाराष्ट्रात सत्ताबदल झाला. सध्या भाजप सत्ताधारी झाल्यामुळं आता आगामी काळातील निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन आखणी सुरू झाली आहे. मुंबई व ठाण्यात पक्षाचं चांगलं बस्तान बसलं आहे. नवी मुंबईच्या वेशीवरील पनवेल, पेण, उरण पट्टा सोडल्यानंतर सिंधुदुर्गपर्यंत कॉंग्रेसमधून आलेले नीतेश राणे वगळता भाजपचा एकही आमदार नसल्याची खंत नेत्यांच्या मनात नेहमीच दिसून येते. प्रामुख्याने रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये संघ परिवाराला मानणारा विशेष वर्ग आहे. परंतू तरीही भाजपला एकही आमदार निवडून आणता आला नाही. त्यामुळं भाजपनं लक्ष्य कोकण ही मोहीम हाती घेतली आहे. तोच संदेश देण्यासाठी व विधानसभा निवडणुकी आधी रायगड ते सिंधुदुर्ग राजकीय मशागत सुरू केली आहे.
दरम्यान, याच पार्श्वभुमीवर प्रदेश भाजपच्या कार्यकारिणीची बैठक शनिवारी दि. 23 रोजी पनवेलमध्ये होत आहे. या बैठकीस भाजप प्रदेश प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी, आमदार, जिल्हाध्यक्ष असे सुमारे आठशे प्रतिनिधी उपस्थित राहतील. ही महत्त्वाची बैठक कोकणात ठेवण्यात येत आहे हा केवळ योगायोग नसून भाजप कोकणाला विशेष महत्त्व देणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं बस्तान चांगलं बसलं आहे. पण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यानं यात भाजपला हवं तसं स्थान मिळवता आलेलं नाही. कोकणाच्या तीन जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण 15 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेचे 9 आमदार असून त्यापैकी भाजपचे तीन, एक भाजप समर्थक, दोन राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे दोन्ही आमदार व तिसरा समर्थक हे नवी मुंबईच्या पट्ट्यात येतात. तर नीतेश राणे हे भाजपचे आमदार आहेत, पण ते भाजपच्या नव्हे तर राणे कुटुंबाच्या ताकदीवर निवडून येतात.