संगमेश्वर मंदिर…

सासवड हे पुण्याजवळचे छोटे शहर आहे आणि पुरंदर तालुक्याचे मुख्यालय आहे. पूर्वी येथे सहा वाड्या होत्या, कालांतराने त्याचे गावात रुपांतर झाले, म्हणून सासवड हे नाव देण्यात आले अशी अाख्यायिका आहे. सासवडमधील वटेश्वर, संगमेश्वर, सिद्धेश्वर ही तीन पांडवकालीन शिवमंदिरे प्राचीन स्थापत्यकलेचा अद््भुत आणि नयनरम्य नमुना आहे. सासवडच्या आसपासची
पौराणिक कालापासून देवांची व संतांची पुण्यशील तपोभूमी म्हणून प्रसिद्ध असलेली ही सासवडनगरी कामाई व चांबळी (भोगवती) यांच्या पवित्र संगमाच्या उत्तर तीरावर वसलेली आहे. सासवड बसस्थानकापासून साधारण १ किमी अंतरावर संगमेश्वर हे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे.
कऱ्हा आणि चांबळी (भोगवती) या नद्यांच्या संगमावर हे मंदिर असल्याने त्याचे नाव संगमेश्वर आहे. चांबळी (भोगवती) नदीच्या बाजूने मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल तयार केला आहे. पूल ओलांडून गेल्यावर मंदिराच्या दगडी पायऱ्या लागतात. दगडी पायऱ्या चढून गेल्यानंतर समोर स्थापत्य आणि शिल्पकलेचा अद््भुत नजारा दिसतो. मंदिरात प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्या नजरेस पडतो एक पुरातन नंदी. त्याच्यासमोरच तीस दगडी खांबांवर उभारलेला मंडप आणि त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दीपमाळा आपले लक्ष वेधून घेतात.
मंदिरात प्रवेश केला की मंडपातील भव्य नंदी दृष्टीस पडतो. मंदिरातील भागात दगडी कासव आणि मंदिरावरील नक्षीकाम सुंदर आहे. मंदिराच्या परिसरातील तुळशी वृंदावनाची रचना ही कल्पक आहे. या तुळशीवृंदावनात वर तुळस मध्यभागी शिवलिंग आणि खाली पाया. तुळशीला घातलेले पाणी मध्यभागी असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडते. मंदिराच्या दक्षिणेस घाट व कऱ्हा तीर आहे. या तीरावर खडकेश्वर आणि सतींची मंदिरे आहेत. उत्तरेला चांबळीच्या तीरावरही महादेवाचं मंदिर आहे. अशा या शिवमंदिराला अवश्य भेट द्या.
मार्ग : पुणे-फुरसंगी-वडकी-दिवे घाट-सासवड-संगमेश्वर मंदिर
दुसरा मार्ग : स्वारगेट-कात्रज-खडी मशीन चौक-येवलेवाडी-बोपदेव घाट-हिवरे गाव -सासवड-संगमेश्वर मंदिर
अंतर : अंतर : ३२ किमी
वाहन : बसेस, चारचाकी, दुचाकी.
जवळची ठिकाणे : जेजुरी खंडोबा मंदिर, दिवे घाटातील विठ्ठलाची मूर्ती, वटेश्वर मंदिर
-सुशील दुधाणे