पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

सहा महिन्यांत साडे पाचशेहून अधिक महिलांवर अत्याचार!

१८७९ महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल

यामध्ये बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीचा समावेश

मागील वर्षीसुद्धा महिला अत्याचारात लक्षणीय वाढ

हुंडाबळी गुन्ह्यातील एकही गुन्हा अद्याप सिद्ध नाही

पुणे : सध्या शहरात बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत या वर्षीच्या केवळ सहा महिन्यांत आतापर्यंत साडे पाचशेहुन गुन्हे दाखल झाले आहेत. या चालू वर्षात (२०२२) १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत म्हणजे केवळ सहा महिन्यांतच बलात्काराचे १५८, विनयभंगाचे २३० आणि हुंडाबळीचे १३५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे चालू वर्षातील फक्त सहा महिन्यांच्या आकडेवारीनुसार विचार केल्यास या वर्षी महिला अत्याचारावरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

चालू वर्षातील केवळ सहा महिन्यांत तब्ब्ल १८७९ म्हणजे दीड हजारांहून अधिक महिलांवर अत्याचार झाला असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. महिला अत्याचारातील सातत्याने होणारी वाढ समाजाला लागलेली कीड असून जवळच्याच व्यक्तीकडून महिलांना धोका असल्याचेसुद्धा अधोरेखित झाले आहे.

दरम्यान, महिला अत्याचारावरील घटनांमध्ये पुणे शहरात वाढ झाली आहे. असे असले तरी त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून उघड झाला आहे. या चालू वर्षात (२०२२) १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत बलात्काराचे १५८ गुन्हे दाखल झाले असून यापैकी ११२ गुन्हे पोलिसांना उघड करण्यात यश आले आहे, तर ४६ गुन्ह्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. महिलांवरील विनयभंगाचे या चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते ३० (२०२२) जूनपर्यंत २३० गुन्हे दाखल झाले आहेत.

यापैकी एकाही गुन्ह्याचा तपास पोलिसांना करता आला नाही. थोडक्यात काय तर, या २३० विनयभंगाचा एकही गुन्हा उघड करण्यात अद्यापही पोलिसांना यश आले नाही, तर चालू वर्षातील म्हणजे १ जानेवारी ते ३० जून (२०२२) दरम्यान १३५ गुन्हे हुंडाबळीचे दाखल असून या १३५ पैकी एकाही गुन्ह्याचा पोलिसांकडून तपास उघड झाला नाही. प्रामुख्याने यातील बलात्कार, विनयभंग आणि हुंडाबळी या घटनेतील तब्बल ४११ गुन्हे पोलिस दरबारात पेंडिंगमध्ये आहेत. यातील केवळ बलात्काराच्या एकूण १५८ गुन्ह्यांपैकी ११२ गुन्ह्यांतील आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

शहरातील पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत या चालू वर्षात म्हणजे १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत (२०२२) ५ महिलांचा नराधमाकडून खून करण्यात आला आहे, तर सध्या या चालू वर्षात एकही गँगरेप झालेला नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. मागील २०२१ मध्ये २७९ बलात्कार झाले असून त्यापैकी २७९ गुन्हे म्हणजे सर्वच गुन्ह्यांचा तपास उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामानाने २०२० मध्ये २५८ गुन्हे बलात्काराचे दाखल असून त्यापैकी २१० गुन्हे उघड झाले आहेत. थोडक्यात ११० आरोपींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे, तर ५८ गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही.

तसेच विनयभंगाचे (२०२१) ३७९ गुन्हे दाखल असून यापैकी ३७० गुन्हे उघड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तर केवळ ९ गुन्हे सध्या पेंडिंगमध्ये आहेत, तसेच ४५३ गुन्हे २०२० मधील असून यापैकी ३११ विनयभंगाचे गुन्हे उघड झाले आहेत, तर २४२ गुन्ह्यांचा तपास सध्या उघड झाला नाही.

महिलांवरील बलात्कार आणि विनयभंगासह (२०२०) मध्ये २२५ हुंडाबळीच्या गुन्हे दाखल आहेत. यापैकी एकाही गुन्हा सिद्ध झालेला नाही, तर (२०२१) मध्ये २४५ दाखल गुन्ह्यांपैकी उघड झाल्याची आकडेवारी सध्या उपलब्ध नाही. (२०१७) मध्ये बलात्काराचे ३४७ गुन्हे, २९८ गुन्हे (२०१८) मधील असून (२०१९) मध्ये २१४ बलात्कार झाले आहेत, तर (२०१७) १ गुन्हा गँगरेप याचा आहे, तर याच वर्षी तब्बल १२ खून महिलांचे झाले आहेत. तसेच (२०१८) मध्ये अत्यंत कमी खून म्हणजे केवळ ४ महिलांचे खून नराधमाकडून करण्यात आले आहे. या सर्व महिला अत्याचारांमध्ये विवाहित, अविवाहित, घटस्फोटित महिला, अल्पवयीन मुली, तसेच १८ वर्षांवरील आदी महिलावर्गाचा समावेश आहे.

मागील पाच वर्षात घडलेले गुन्हे

      २०१७ २०१८  २०१९    २०२०    २०२१    २०२२

बलात्कार ३४७ २९८ २१४ २५८ २७९ १५८
विनयभंग ६९९ ६४० ४१४ ४५३ ३७९ २३०
हुंडाबळी ३२९ ३१९ ३१० २२५ २४५ १३५
खुनातील १२ ४ ११ ९ ५
गँगरेप १ नाही १ नाही नाही

महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना

 महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पुणे पोलिस दलात दामिनी पथक, महिला हेल्पलाइन, महिला सहायता कक्ष, भरोसा सेल अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर पीडित महिला आणि तरुणींना सर्वतोपरी मदत केली जाते. महिला आणि तरुणींबाबत गैरप्रकार घडत असल्यास दामिनी पथक किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी अवघ्या काही मिनिटांत घटनेच्या ठिकाणी पोहोचून पीडित महिलांची सोडवणूक करतात. छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी दामिनी पथक, पोलिसकाका, तर नोकरदार महिलांच्या मदतीसाठी बडी कॉप सुविधा, छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी सतत बीट मार्शलची गस्त यांसारख्या विविध उपाययोजना पुणे पोलिसांकडून शहरात सुरू आहेत.

 महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांकडून कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात, याविषयी माहिती देताना गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे म्हणाले, महिला अत्याचाराच्या बहुतांश घटना या ओळखीच्या व्यक्तीकडूनच घडतात. आपली बदनामी होईल, नातेवाईक आपल्याला स्वीकारणार नाहीत, अशा धास्तीने पीडित महिला अत्याचाराच्या घटनांना वाचा फोडत नाहीत. अशा वेळी पोलिसांच्या भरोसा सेलच्या माध्यमातून या महिलांना विश्वासात घेतले जाते, त्यांचे नाव बाहेर कुठेही लीक होणार नाही, याचा विश्वास त्यांना दिला जातो आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाते. सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने फसवून लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून वाढ झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करताना महिलांनी खबरदारी घेतली पाहिजे. अनोळखी व्यक्तीसोबत मैत्री करू नये. योग्य त्या वेळी योग्य ती खबरदारी घेतली तर महिला अत्याचाराच्या अनेक घटना टाळता येऊ शकतात.

महिलांवरील होणारे अत्याचार धोकादायक आहेत. बहुतांश घटनांमध्ये सुरुवातीला पीडित महिला तक्रार देण्यास पुढे येत नाही. मात्र, छळमर्यादेच्या पलीकडे गेल्यानंतर पीडित महिला अन्यायाची तक्रार देण्यासाठी येत असतात. हल्ली तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. भरोसा सेलच्या माध्यमातून बऱ्याच पीडित महिलांना न्याय देण्याचे काम केले गेले आहेत. निःसंकोचपणे पीडित महिलांनी पुढे यावे. कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये.
सुनील थोपटे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भरोसा सेल, (पोलिस आयुक्तालय)

मी जातीच्या बाहेर लग्न केले. आमच्या लग्नाला सर्वप्रथम नवऱ्याच्या आईनेच मागणी घातली. माझ्या घरच्यांनी खूप विचार करून लग्नाला होकार दिला. आता लग्न होऊन सहा महिने झाले. नवरा नांदवत नाही. घटस्फोट घ्या म्हणते. पती, सासू, सासरे मारहाण व छळ करतात. पैशासाठी मारहाण करतात. मला दोन महिन्यांपासून नवऱ्याने सोडले आहे.
मला न्याय हवा आहे.

पीडित विवाहित महिला, (वानवडी)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये