Top 5पुणेमहाराष्ट्र

“माध्यमे समाजाचे प्रतिबिंब”: बागाईतकर

‘न्या. लोयांचा खुनी कोण?’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : ज्येष्ठ शोधपत्रकार निरंजन टकले यांनी लिहिलेल्या ‘न्या. लोयांचा खुनी कोण?’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ पत्रकार अनंत बागाईतकर, ज्येष्ठ लेखक संजय सोनवणी आणि पुस्तकाचे लेखक निरंजन टकले यांच्या हस्ते झाले. हा समारंभ एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या मुख्य सभागृहात झाला. युवक क्रांती दल, संविधानिक राष्ट्रवाद मंच, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारूती मंदिर, जनसेवा सहयोग कम्युनिटी सेंटर, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुप (ट्रस्ट) आणि जय हिंद लोकचळवळ या संस्थांनी संयुक्तपणे या समारंभाचे संयोजन केले. संदीप बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अनंत बागाईतकर म्हणाले, ‘‘माध्यमे समाजाचे प्रतिबिंब मांडतात. असत्याच्या गलबल्यातून सत्य शोधणे ही शोधपत्रकारिता आहे. न्या. लोया यांच्या खुनाची चौकशी व्हावी, हीच सत्यशोधनाची मागणी निरंजन टकले यांची आहे. हत्येमागे मोठी व्यक्ती असेल तर गांभीर्य वाढते. लोया हत्या प्रकरणात नक्कीच पाणी मुरत आहे. दोष समोर आणणे सत्ताधीशांना नको असते. राजसत्तेचे दबाव येतात आणि कोणताही पक्ष त्याला अपवाद नाही. पत्रकारांनी प्रवाहाच्या विरोधात पोहले पाहिजे. पत्रकारांप्रमाणे सामाजिक संस्था, नागरिकांनाही लोकशाहीची लढाई लढावी लागणार आहे. मुस्कटदाबी थांबवून अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी उभे राहावे लागणार आहे. सध्याची वाटचाल अराजकतेकडे सुरू आहे.’’

पुढील पुस्तक सावरकरांवर असेल आणि ते ‘अ लॅम्ब लायनाइज्ड’ या नावाचे असेल. न्या. लोया यांच्या आकस्मिक मृत्यूचा शोध घेताना, शोधपत्रकारिता करताना माझा पाठलाग होत होता. शोधपत्रकाराला येणाऱ्या अडचणींवर मात करण्याच्या पर्यायांचा सतत विचार करावा लागतो. जीवावर बेतण्याची शक्यता सतत होती. पुस्तकलेखन म्हणजे जनतेच्या न्यायालयात जाणे होय. मागच्या पिढीला जसे शांत, निर्भय, धर्मनिरपेक्ष वातावरण मिळाले, तसे पुढील पिढीला मिळवून देणे, ही आपली जबाबदारी आहे.
— निरंजन टकले, लेखक

टकले म्हणाले, ‘‘जी बातमी छापून येऊ नये, असे कोणाला वाटत असते, तीच शोधणे हे शोधपत्रकाराचे काम आहे. सत्याला वाचा फोडणे, हे शोधपत्रकारितेचे काम आहे. अशा शोधपत्रकारितेला माध्यमात जागा असायला हवी. न्या. ब्रिजगोपाल लोया यांच्या मृत्यूचा माध्यमांतून पाठपुरावा घेतला गेला नाही. मोठे प्रकाशक मागे हटत होते. आयएसबीएन नंबर मिळत नव्हता. तरीही पुस्तक प्रकाशित झाले. द्वेषमूलक कारभार थांबविण्यासाठी देशात वाढलेला विषवृक्ष तोडला पाहिजे, आपण सत्याची कुऱ्हाड उचलली पाहिजे.’’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये