“दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपचा मुख्य व्यवसाय”

मुंबई | Nana Patole On BJP – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भाजपकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजप नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे. भाजपकडून सुरू असलेला हा प्रकार लोकशाहीत फार काळ टिकणार नाही असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भाजप पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला त्याला जनता घाबरली नाही. आता स्वतंत्र भारतात भाजप इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पाहत आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाडतानाही भाजपने याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत.
विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचं राजकारण केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू, असं देखील नाना पटोले म्हणाले.