रत्नागिरी जिल्ह्यातील ‘चिरंजीव परशुराम भूमी’ स्मारक

बुरोंडी : भगवान परशुरामाने कोकणची भूमी निर्माण केली. कोकणच्या या पवित्र भूमीत चिपळूण तालुक्यातील परशुराम या गावी भगवान परशुरामाचे मंदिर आहे. तिथे हजारो भाविक दरवर्षी भेट देत असतात. मात्र असेच एक स्मारक दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे उभारण्यात आले आहे. परशुरामांनी या नवनिर्मित प्रदेशात देशोदेशीच्या ऋषींना, तज्ज्ञांना पाचारण करून जमिनीची मशागत केली, गोधन आणले, जमिनीची प्रत तपासून वृक्ष लागवड केली, पिके कोणती घ्यावी हे ठरवले, वसाहती स्थापन केल्या, कोकण भूमीला ‘सुजलाम् सुफलाम्’ केले.
अशा भगवान परशुरामांचे मूर्त रूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढीपर्यंत अधिक परिणामकारकरीत्या पोहचावा, म्हणून दापोलीत बुरोंडी येथे ‘चिरंजीव परशुराम भूमी’ स्मारक निर्माण करण्यात आले आहे. इनोव्हेटिव्ह टेक्नोमिक्स प्रा.लि. भोसरी आणि मॉडर्न ऑप्टिशियन्स, पुणे यांचे संचालक अनिल गोविंद गानू आणि सौ. अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे. स्मारकात ४० फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर २१ फूट उंचीची परशुरामांची भव्य मूर्ती उभी आहे. ही मूर्ती ताम्रवर्णीय असून फायबर ग्लासमध्ये बनवलेली आहे. सोलापूरचे शिल्पकार ज्ञानेश्वर शिवाजी गाजूल यांनी वर्षभराच्या मेहनतीतून ही मूर्ती साकारली आहे. १६ नोव्हेंबर २०१० रोजी स्थानापन्न करण्यात आलेली ही मूर्ती उत्तराभिमुख असून तामसतीर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्रकिनाऱ्याचे दर्शन तेथून घडते. पूर्वेस व दक्षिणेस हिरव्यागार डोंगररांगा आहेत. दापोलीत येणारे पर्यटक या स्मारकाला आवर्जून भेट देतात.