आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने पटकावला ‘आयर्नमॅन’चा किताब; 11 तास 50 मिनिटांत जिंकली स्पर्धा

पिपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी ‘आयर्नमॅन’चा किताब जिंकला आहे. कझाकिस्तान येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी 16 तास 30 मिनिटात पूर्ण करावयाचे स्पर्धेतील अंतर 11 तास 50 मिनिटांत पूर्ण करून किताब आपल्या नावावर केला आहे.
अवघ्या एका वर्षात तयारी करून गोमारे यांनी हे यश मिळवलं आहे. अत्यंत खडतर मानली जाणारी ही स्पर्धा 3.8 किलोमीटर स्विमिंग, 180 किलोमीटर सायकलींग आणि 42 किलोमीटर रनिंग एवढ्या अंतराची होती. स्विमिंग 1 तास 37 मिनिटे, सायकलिंग 5 तास 40 मिनिटे आणि 4 तास 15 मिनिटे अशा प्रकारे एकूण 11 तास 50 मिनिटांत त्यांनी हे अंतर पार केलं आहे.
पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांच्यापासून प्रेरणा घेऊन सदर स्पर्धेसाठी तयारी केली असून त्यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं असल्याचं गोमारे यांनी सांगितलं आहे. स्पर्धा जिंकून परत आल्यानंतर गोमारे यांनी त्यांच्या आईच्या गळ्यात मेडल घातलं. स्पर्धेसाठी पत्नीची आणि मित्रांची मोलाची साथ होती असंही गोमारे यांनी सांगितलं. ‘अल्ट्रा आयर्नमॅन’चा किताब मिळवण्याचं त्यांचं पुढचं उद्दिष्ट असल्याचं देखील राम गोमारे यांनी सांगितलं आहे.