आनंदवनमध्ये फोडली ‘व्यसनमुक्तीची दहीहंडी’

पुणे : व्यसनमुक्तीचा एकच नारा… आयुष्यात व्यसनाला नका देऊ थारा… अशा घोषणा देत चंदननगर येथील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रामध्ये व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. व्यसन सोडा फुलेल जीवन, नशा छोडो बोतल तोडो, व्यसनमुक्त समाज घडवूया आनंददायी जीवन जगूया, अशा आशयाचे फलक दहीहंडीला लावण्यात आले होते.
आनंदवनमध्ये एका नव्या आयुष्याची सुरुवात उत्साहाने करू, असा संकल्प सर्वांनी केला. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाणे यांच्या संकल्पनेतून या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संतोष पटवर्धन, प्रमोद शेळके, गणेश गावडे, केतन जैन, विशाल शिंदे, प्रकाश धिडे, नंदू हरपळे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला.
डॉ. दुधाणे म्हणाले, की कोणत्याही प्रकारची नशा न करता देखील सण-उत्सवांचा आनंद घेता येतो. व्यसनाधीन तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. व्यसनमुक्तीची दहीहंडी फोडून व्यसनांमुळे काय अपाय होतात, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, हे समाजाला समजणे गरजेचे आहे.