‘अभिनव’मध्ये पुस्तक हंडी

पुणे : कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे वाचनाकडे झालेले दुर्लक्ष लक्षात घेऊन या वर्षी पुस्तक हंडी आयोजित करण्यात आली होती. या माध्यमातून वाचनाचे महत्त्व हा संदेश देत अभिनवमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात
दहीहंडी फोडली.
अनोखा जोश आणि उत्साहात आंबेगावच्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मीडिअम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. बारावीच्या विद्यार्थ्यांनीच ताकत, ध्येय, धैर्य आणि ऐक्य दाखवत दहीहंडी फोडली. या वेळी हंडीतील पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
दहीहंडीचा उत्सव शालेय वातावरणात साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे दहीहंडी फोडताना विद्यार्थ्यांना समता, बंधुभाव, एकाग्रता, संघभावना, वेळेचे नियोजन या गोष्टींचे महत्त्व समजावे हे होते. अभ्यासाबरोबरच महाराष्ट्रातील सामाजिक आणि पारंपरिक सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून ‘अभिनव’मध्ये सातत्याने अशा प्रकारचे उपक्रम राबवण्यात येतात. उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्राचार्या वर्षा शर्मा, कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि सर्व शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.