पावसाने बळीराजीकडे पाठ फिरवल्याने वाढली चिंता!
![पावसाने बळीराजीकडे पाठ फिरवल्याने वाढली चिंता! Former](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/Former--780x470.jpg)
औरंगाबाद : मागील तीन आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांपासून वरुणराजानं शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्यानं त्यांची चिंता वाढताना दिसत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने सध्या दांडी मारली आहे. त्यामुळे उभी असलेली पिकं माना खाली टाकताना दिसत आहेत. येत्या काही दिवसात पावसाचे आगमन झाले नाही तर, औरंगाबाद जिल्ह्यासह परिसरातील बळीराजाचे मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी आनंदीत झाला होता. मात्र, त्यांना काय माहित त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फक्त काही दिवसांपुरताच मर्यादित आहे. तेव्हापासून आता तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले असून अद्याप पावसाने पाठ फिरवली आहे. यामुळे व्यतीथ झालेल्या बळीराजाची आकाशाकडे नजर लागली आहे.
सुरुवातील चांगला पाऊस झाल्यामुळे सध्या पिकं जोमात डोलताना दिसत आहेत, मात्र वेळीच वरुणराजा बरसला नाही तर बळीराजाला कपाळाला हात लावून आकाशाकडे नजर ठेवण्याशिवाय त्यांच्या हाती काहीच राहणार नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढताना दिसून येत आहेत.