शिंदे गटातील आमदार सरनाईकांची ईडी चौकशी बंद? सोमय्या मौनावस्थेत!
![शिंदे गटातील आमदार सरनाईकांची ईडी चौकशी बंद? सोमय्या मौनावस्थेत! ED And Eknath Shinde](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/09/ED-And-Eknath-Shinde-780x470.jpg)
मुंबई : (Pratap Sarnaik released from ED action) शिवसेनेशी बंडखोरी केलेले आणि सध्या शिंदे गटात असणारे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सिक्युरिटी फर्मविरोधात गैरसमजातून तक्रार दाखल केली असल्याची माहिती विशेष पीएमपीएल न्यायालयात देत टाॅप्स ग्रुपचे माजी संचालक रमेश अय्यर यांनी अहवालावर सादर केला होता. यावर पोलिसांकडून कोणताही आक्षेप घेतला नसल्यानं सरनाईक यांच्यावरील ईडीची टांगती तलवार म्यान होणार असल्याचे दिसून येत आहे.
भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर टाॅप्स समूह घोटाळा प्रकरणाच्या आधारेच ईडीने सरनाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. परंतु महानगर दंडाधिकारी न्यायालयाने तपास बंद करण्याचा अहवाल स्वीकारल्याने त्यांच्यामागील लागलेला ईडीचा ससेमिरा थांबण्याची शक्यता आहे.
दरम्यान, चार महिन्यांपुर्वी सरनाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांना अटक करण्यासाठी उर बडवत मागणी करणारे किरीट सोमय्या आत्ता मात्र चिडीचूप असल्याचे पहायला मिळताना दिसत आहेत. माध्यमांनी याविषयी सोमय्यांना विचारणा केली असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास सफसेल नकार दिला आहे. यावर आपल्याला काही बोलायचं नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यापासून सोमय्या शिंदे गटातील नेत्यांवर बोलताना अनेक वेळा तोंडघशी पडल्याचे पहायला मिळाले आहेत.