चित्रपट पुनरावलोकन : KABZAA / कब्झा

गुरुदत्त सोनसूरकर |
मुंबईचे गँगस्टर्स, त्यांचा इतिहास आणि ऐंशी-नव्वदच्या काळात त्यांनी केलेली व्यावसायिक स्थित्यंतरं ही एकंदरीतच फार फिल्मी प्रकरणं आहेत. एखाद्या गोष्टीला आपण फिल्मी केव्हा म्हणतो तर जेव्हा ते आपल्या रोजच्या सामान्य आयुष्यापेक्षा थोडं वेगळं, उत्कंठावर्धक असतं. निव्वळ आयुष्यच नाही तर ही माणसंसुद्धा फार रंजक, अर्क बनलेली असतात. दिग्दर्शक राम गोपाल वर्माला अंडरवर्ल्ड शिताफीने रेखाटणारा दिग्दर्शक म्हटलं जातं; पण त्याही आधी एका माणसाने अंडरवर्ल्ड अंडरवर्ल्ड असा धोशा न लावता त्याच्या चित्रपटातून येणारी अंडरवर्ल्डमधली माणसं बेहतरीन चितारली आहेत.
महेश भट. याच्या सुरुवातीच्या चित्रपटातून दिसत राहणारी, गुन्हेगारी विश्वातली अगदी छोटी पात्रंसुद्धा अस्सल वाटतात. नाम, आवारगी, साथी, सडक, सर. अशी पात्रं जी गुन्हेगारी विश्वाच्या मिड लेव्हल असतात, ती भटसाहेबांच्या चित्रपटात व्यवस्थित दिसायची.
महेश भट आणि मुकेश भट या भावांनी जेव्हा विशेष फिल्म्स चालू केली तेव्हा त्यांच्या कंपनीत एक स्टोरी डिपार्टमेंट सुरू केलं. इतर निर्मात्यांकडे लेखक असायचे पण इथे रॉबिन भट आणि एक टीम असायची. जसं गुलशन कुमारने गाण्यांची एक बँक बनवली होती तशी विशेष फिल्मसची लेखक मंडळी फिल्मी कथांची एक बँक बनवत असे आणि त्या करता जगभरातले सिनेमे पाहिले जात. त्या वरून मग भारतीय मुलामा देऊन कथा लिहिल्या जात. असाच एक १९५४ चा मार्लन ब्रँडोचा चित्रपट ऑन दी वॉटरफ्रंट यावरून विशेष फिल्मने सलीम खान लिखित आणि महेश भट दिग्दर्शित एक चित्रपट १९८८ ला आणला. कब्जा.
रंजीत वर्मा हा एका गँगस्टर ‘वेलजी सोडा’ याचा वकील असतो. रंजीतचा लहान भाऊ रवी हा आयुष्यात काही ध्येय नसलेला एक उनाड तरुण. कधीतरी वेळ घालवायला म्हणून वेलजीच्या टोळीत येऊन बसणे, पोरगी पटवायला नोकरी धरणे असा त्याचा जीवनक्रम चालू असतो. इकडे वेलजीकडे एक राजकीय नेता मंदार भागवत मुंबईतली एक मोठी जमीन खाली करून देण्याची सुपारी देतो. ही जमीन असते उस्ताद अली मोहम्मद या स्वातंत्र्यसैनिकाची. हा म्हातारा काही अनाथ मुलांना घेऊन तिथे रहात असतो. त्याला त्या जमिनीवर मुलांसाठी एक उद्यान बनवायचं आहे आणि त्यासाठी ती जमीन तो फुकट द्यायलाही तयार आहे. मात्र वेलजीचे ही जमीन घ्यायचे सगळे प्रयत्न अली मोहम्मद उधळून लावतो.
एक शेवटचा प्रयत्न म्हणून रिकामटेकड्या रवीला वेलजी, अली मोहम्मदच्या घरी त्याला धमकवायला पाठवतो. मात्र म्हाताऱ्याच्या खंबीर आणि तत्त्वनिष्ठ भूमिकेने रवी बदलतो. ही लढाई रवी आपल्या हातात घेतो. वेलजी विरुद्ध लढणं सोप्पं नसतं तरीही… थेला भारतीय करताना ऐंशी नव्वदच्या दशकात मुंबईतल्या रिकाम्या भूखंडांवर कब्जा करणाऱ्या बांधकाम व्यवसायाचा अविभाज्य घटक असणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा जोड लेखक सलीम खान यांनी चपखल बसवला आहे. एका प्रसंगात राजकारणी मंदार भागवत हा वेलजीभाईला म्हणतो सुद्धा, “बंबई में कितनी जमीने ऐसे ही फंसी पडी हैं.” म्हणजे डिस्प्युटेड लँड्स. विवादित जमिनी त्या काळात भाईलोक सेटल करायचे.
मुंबईतल्या रक्तरंजित गँगवॉरचं मूळ पाहाल तर अशाच एका भूखंडावरून झालेले वाद कारणीभूत आहेत. दुर्दैवाने कब्जा अथपासून इतिपर्यंत तो टेम्पो राखू शकला नाहीये. कारण चित्रपटाची लांबी खूप झाल्याने करावी लागलेली काटछाट. आणि यामुळे अनेक गोष्टी संदर्भहीन वाटतात. त्यातली रवीच्या पात्राला असलेला ब्रेन ट्यूमर ही एक. रवीच्या शरीरातून गोळ्या काढताना, “चला लगे हाथ हा ट्यूमरसुद्धा काढुया” असं म्हणत डॉक्टर स्मिता (हे नाव स्मिता पाटील यांना आदरांजली म्हणून असावं हा कयास) तो ट्यूमर काढते असा भयानक हिंदी चित्रपटपणासुद्धा आहे कब्जामध्ये. एका प्रसंगात नायिका रिटा ही रवीच्या कानाखाली मारते कारण ते दोघं ज्या दुकानात काम करत असतात त्या दुकानाचा मालक हे बघत असतो आणि तिला आपली नोकरी गमवायची नाही. दुसऱ्याच क्षणी रवी आणि रिटा त्याच मालकासमोर गाणं म्हणत नाचत असतात.
ह्या काही गोष्टी सोडल्यास कब्जा एक उत्तम मसाला चित्रपट आहे आणि तत्कालीन राजकीय सामाजिक संदर्भ असलेला ही. गुंड वेलजी शेवटी राजकारणात उतरतो हे आज फार नवीन नसेल पण १९८८ मध्ये ते त्या वेळचं वास्तव होतं आणि म्हणून तेव्हा चित्रपटातूनही ते चमकदार वाटलं होतं. कब्जाचा शेवट मात्र यथा तथाच आहे. महेश भट यांच्या चित्रपटात क्लायमॅक्स ते स्टंट मास्टरवर सोडून देत असावेत. यापेक्षा १९९० चा राजकुमार संतोषी – सनी देओलचा घायल आणि १९९८ चा आमीर-विक्रम भटचा गुलाम खूपच चांगले झाले होते. लेखक सलीम खान यांनी अली मोहम्मद या पात्राद्वारे आपलं तत्त्वज्ञान मांडल्याचं दिसतं.
एका प्रसंगात अली मोहम्मद त्याच्या बालोद्यानाची जबाबदारी घेऊन ऐनवेळी नकार देणाऱ्या आणि सतत “मैं गॉड फिअरींग मॅन हैं” म्हणणाऱ्या डिसिल्वाला सांगतो. “देव ही भ्यायची गोष्ट नाही. तुझ्या ऑफिसमध्ये तू येशूची तस्वीर देव म्हणून नाही लावलीयेस. येशूला तू देव नाही जामीन देणारा बनवलं आहेस.” दुसऱ्या प्रसंगात आपल्या अशीच ऐनवेळी पलटी खाणाऱ्या एकेकाळच्या आपल्या विद्यार्थ्याला आणि आताच्या आयुक्ताला तो सुनावतो, “भुखा पेट से, झूठा गले से और सच्चा दिल से गाता हैं. मैं तुम्हे गाना सिखा नही सका.”
बाकी चित्रपटात अभिनयाची बाजू संजय दत्तने बऱ्यापैकी सांभाळली आहे. खऱ्या आयुष्यातही तो असाच उनाड रवी असल्याने ही भूमिका त्याने समरसून केली आहे. अली मोहम्मदच्या प्रभावाखाली आल्यानंतर बदललेला रवी त्याने सुंदर उभा केलेला आहे. अमृता सिंग नावाला नायिका आहे. खरं तर विशेष भूमिका म्हटली गेलेली डिंपल कपाडियाची भूमिका अमृतापेक्षा जास्त वाटते. राज बब्बर नेहमीप्रमाणे. दोन वर्षांनी याच कथेवर बेतलेल्या “घायल” मध्ये त्याने अशीच मोठ्या भावाची भूमिका केलेली आहे ही गंमत. अनुपम खेर छोट्याशा भूमिकेत आहे. महेश भट यांचे आवडते अवतार गिल, आकाश खुराना, मुश्ताक खान आहेतच. महेश आनंदला बरी भूमिका आहे. आलोकनाथ याला भावखाऊ अली मोहम्मद यांची भूमिका मिळाली आणि त्याने ती उत्तम निभावलीय. पण खरी मजा आणली आहे परेश रावल आणि निळू फुले यांनी.
परेश रावलचा वेलजी हा त्या काळात हिंदी सिनेसृष्टीत बदलणाऱ्या खलनायकाच्या प्रतिमेतील एक पाऊल होतं. एकीकडे शाकाल, मोगॅम्बोसारखे अवास्तव खलनायक तर एकीकडे वेलजी, लोटिया पठाणसारखी वास्तवाला धरून असणारी पात्रं. हा वेलजी शरीराने बलदंड नसला आणि थोडा बावळट असला तरी हिंस्र आहे. एका प्रसंगात त्याचा प्रतिस्पर्धी म्हणतो, “हम लालची मगर इंसान हैं वेलजी एक वहशी जानवर हैं जानवर.” सलीम खान आणि महेश भट यांनी या पात्राला उभं करण्यात जी मेहनत घेतलीय तेवढाच न्याय परेशभाईने प्रामाणिकपणे वेलजी सोडा या व्यक्तिरेखेला दिलाय. इतका की महेश भट यांनी सरमध्ये परत परेश रावललाच घेऊन हा वेलजीभाई परत आणलाय.
परेशभाई आणि आपले निळू भाऊ यांचे दोनेक प्रसंग असतील एकत्र पण निळू भाऊंनी आपल्या राजकारण्याच्या भूमिकेत मचांड कियेला हैं. अगदी थंड, अंडरप्ले करत बेरकी नजरेने वेलजीला कह्यात ठेवत मंदार भागवत आपला वरचष्मा राखून असतो. वेलजीने चहाबरोबर दिलेलं बिस्कीट हातात घेऊन, ते निरखून परत प्लेटमध्ये फेकत आपलं बोलणं सुरू ठेवणारा हा भागवत म्हणजे एक वल्ली आहे.
कब्जाची अजून एक चांगली बाजू म्हणजे त्याचं संगीत. नेहमीचा उपेक्षित संगीतकार राजेश रोशन याने तुम से मिले बिन चैन नहीं आता मैं क्या करू (किशोर – अनुपमा देशपांडे), दिल की अदालत प्यार का मुकदमा, ए मेरे मालिक तू सब का भला कर (अझीझ), हिरे मोतियों से (आशा) अशी हिट गाणी दिलीयेत.
ओव्हर ऑल कब्जा एकदा मॅटिनीला टाकण्यासारखा आहे. कधी काळी मुंबईची असणारी ही कथा काळाच्या पट्ट्यावर पुढे पुढे सरकत भारताच्या प्रत्येक शहराची झालेली आहे.