रामदास कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “कुणी दाढी काढावी…”
मुंबई | Ajit Pawar On Ramdas Kadam – एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) शिवसेनेसोबत बंडखोरी करून 40 आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात नवं सरकार स्थापन झालं. तसंच आमदारांनी केलेल्या बंडाळीनंतर शिवसेना पक्षात फूट पडली. त्यामुळे शिंदे गट (Shinde Group) आणि शिवसेना (Shivsena) नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यामध्ये शिंदे गटाचे आमदार रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली होती. या संदर्भात आता राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास कदम यांनी दापोलीत घेतलेल्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. “आंबादास तुम्ही सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करून बघ. मग बायको आल्यावर संसार कसा असतो ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा काय? लग्न तर करून बघ म्हणजे समजेल तुला संसार काय असतो ते. म्हणजे खोके काय असतील ते कळेल”, असं रामदास कदम म्हणाले होते. यावरून शिवसेनेकडून आक्षेप घेतला जात असतानाच आता अजित पवारांनीही त्यावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले, “तुम्ही राजकारणापुरतं राजकारण करा. पण ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्राला तशी शिकवण नाही. ज्यात राज्याचं नुकसान होतंय, बेरोजगारांच्या नोकऱ्या जातायत, अशा विषयांवर बोला. वैयक्तिक टीका-टिप्पणी कशाला करता? कुणी दाढी वाढवावी, कुणी दाढी काढावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण त्यावर बोलण्याचं काय कारण आहे?” असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
“माझी रामदास कदम यांच्याशी ओळख आहे. ते सरकारमध्ये असताना आम्ही त्यांच्याकडे काम घेऊन जायचो. मी सरकारमध्ये असताना ते माझ्याकडे कामं घेऊन यायचे. पण या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर बोलणं ही परंपरा महाराष्ट्राची नाही. कुणाची वैयक्तिक निंदा-नालस्ती करणं बरोबर नाही. हे लोकांना आवडत नाही. मागच्या काळात काही लोकांनी मोठ्या नेत्यांची चेष्टा केली होती. सोनिया गांधींचीही काहींनी चेष्टा केली होती. ते लोकांना आवडलं नाही”, असं अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “तुम्ही तुमची भूमिका मांडा. सरकारचं काही चुकत असेल तर विरोधकांनी ते दाखवावं. विरोधकांचं काही चुकत असेल, तर ते सरकारनं दाखवावं. पण कुणाच्या लग्नाचं काय झालं, कुणाच्या दाढीचं काय झालं हे कशाला?”, अशा शब्दांत अजित पवारांनी रामदास कदमांवर हल्लाबोल केला.