एक तरी ओवी अनुभवावी

-प्रकाश पागनीस
!! जय श्री राम !!
!! ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन !!
!!अ. १३ वा. “पंचमहाभौतिकता”!!
माऊलींनी पिंडी ते ब्रह्मांडी या गोरक्षनाथ मताचा मागोवा प्रस्तुत ओव्यांमध्ये घेतला आहे.
पृथ्वीतत्त्व-शरीर,आपतत्त्व-प्रवाहीत अन्नरस आणि रक्त, तेज-शरीरातील उष्णता, वायु-फुफ्फुसाचे कार्य वायुतत्त्वावर चालते. आकाशतत्त्व -मेंदूमधील न समजणारी कार्ये होय.
शरीर संपल्यावर पंचतत्त्वे प्रारब्धाने लाभलेले शरीरामार्फत उत्तर जन्म भोगते.
या ओव्यात गुरूसेवा संपूच नये, मानणारा शिष्य काय मागणी करतो.
ते पाहा.
जवं देह हे असेल! तवं वोळगी ऐसी किजेल!
मग देहांती नवल! बुद्धि आहे !!४३१!!
इयें शरीराची माती! मेळवीन तये क्षिती !
जेथे श्रीचण उभे ठाती! श्रीगुरूंचे !!४३२!!
माझा स्वामी कवतिके!
स्पर्शीजति जिये उदके!
तेथ लया नेईन निके! आपीं आप !!४३३!!
श्रीगुरू वोवाळजती!
कां भुवनीं जे उजळजती!
तयां दीपांचिये दीप्ती! ठेवीन तेज !!४३४!!
चवरी हन विंजणा!
तेथ लयो करीन प्राणा!
मग आंगाचा वोळगणा!
होईन मी !!४३५!
जिये जिये अवकाशी!
श्रीगुरू असती परिवारेसी!
आकाश लया आकाशी! नेईन तिये !!४३६!!
परि जीतु मेला न संडीं! निमेषु लोका न धाडी!
ऐसेनी गणविया कोडी! कल्पांचियां !!४३७!!
येतुलेवरी धिवसा!जियांचिया मानसा!
करोनियाहि आणि तैसा!अपारु जो !!४३८!!
रात्र दिवस नेणे! थोडे बहु न म्हणे !
म्हणणियाचेनि दाटपणे !साजा होय !!४३९!!
तो व्यापारु येणे नांवे!गगनाहुनी थोरावे!
एकला करी आघवे! एकेचि काळीं !!४४०!!
भावार्थ : ओ. ४३१ ते ४४०.
शिष्य म्हणतो हे गुरू शरीर जिवंत आहे तो पर्यंत सेवा करेन. देहांतानंतर ध्येयनिश्चिती असल्याने मरणोत्तर पंचमहाभौतिक देहाचा विचार बुद्धिने केला आहे.
ज्या ठिकाणी गुरू उभे राहतील त्या पायाखालची माती मी असेन.
श्रीगुरू ज्या पाण्याला पिण्यासाठी, खाण्यासाठी स्नानासाठी स्पर्श करतील ते पाणीच मी असेन.
श्रीगुरू ज्या दिव्यांनी वोवाळले जातील त्या दिव्यांचे तेज माझे असावे. त्यांना चवरीने वारा घातला जात असेल किंवा हातातील पंख्यांनी ते वारा घेतील. ते वारे माझ्या मरणानंतरचे पंचप्राण असतील.
माझ्यातील आकाशतत्त्व त्यांचा आश्रमातील अवकाश असेल.
मी जिवंत असेपर्यंतच काय मेल्यावरसुद्धा गुरूसेवेत कसा असेन, याच्या कल्पना मी केलेल्या आहेत.
या पद्धतीने माझ्या मनात मरणोत्तर सेवाभाव जागा असेल.
रात्रंदिवस सेवाव्रतींची गर्दी गुरूंचे भोवती भरून राहिलेली असते. अशा संकल्पना गुरूंना सुशोभित करतात.
माझ्या कल्पनेच्या व्यापाराने गगनापेक्षा मोठी उंची गाठली आहे.
श्रीगुरूंच्या सेवेत मी एकटाच असेन
गुरू शिष्य संवाद मनातील स्वैर कल्पनांना नेमकी दिशा देतो.
!! विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा! विठ्ठल उभा पाहावा विटेवरी!!