खेडच्या विकासासाठी साखर कारखाना हवा…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य विद्याशाखेतील सहकार आणि ग्रामीण विकास अभ्यास मंडळांतर्गत विद्यावाचस्पती (पीएच. डी.) पदवीसाठी “पुणे जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्याची प्रगती, समस्या व आव्हाने : विश्लेषणात्मक अभ्यास” या विषयावर मी संशोधन केले. यासाठी प्राचार्य डॉ. एच. एम. जरे यांनी मला मार्गदर्शन केले. यानिमित्ताने सहकारी साखर कारखान्यात असणाऱ्या समस्यांचा अभ्यास करताना प्रशासनाला ध्येयधोरणे ठरवण्यासाठी उपयुक्त शिफारशी करता आल्या.
या संशोधनात साखर कारखान्यांची प्रगती, उत्पादन, विपणन कर्मचाऱ्यांसंदर्भातील समस्या, सहकारी साखर कारखान्यांना जाणवणाऱ्या महत्त्वपूर्ण अडचणी, साखर कारखान्यांना जाणवणारी आव्हाने, कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन आणि वेतनेतर सुविधा, संघटना व व्यवस्थापकीय समस्या, साखर कारखान्याच्या स्थापनेमुळे ग्रामीण विकास व रोजगारनिर्मिती होते की नाही, यासंदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करणे सोयीस्कर ठरेल किंवा कोणत्या शिफारशी यांच्या माध्यमातून सुचवता येऊ शकतात, या उद्दिष्टांचा प्रामुख्याने विचार केला.
साखर कारखान्यांना भेटी दिल्या. प्रश्नावलीच्या माध्यमातून मुलाखती घेऊन निरीक्षणे नोंदवली. साखर कारखान्यांनी सभासद शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत वेळेत द्यावी. दैनंदिन कामकाजात व्यावसायिकतेचा प्राधान्याने विचार करावा. कारखान्यांनी साखर उत्पादन खर्च कमीत कमी होण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावा. कर्मचाऱ्यांना वेळेत पुरेसे वेतन आणि वेतनेतर सुविधा मिळाव्यात. साखर कारखान्यांतर्गत असणाऱ्या कायद्यांची अंमलबजावणी प्रभावी व्हावी. साखर निर्यातीला प्रोत्साहन मिळावे. आर्थिक अडचणीतील कारखान्यांना पुरेसे अर्थसहाय्य करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न करावेत, अशा अनेक बाबी मी यात नोंदविल्या आहेत.
मी राजगुरुनगरची रहिवासी आहे. पुणे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत खेड तालुक्यामध्ये एकही साखर कारखाना नाही. हेही मी त्यात नमूद केले आहे. भविष्यात या तालुक्याच्या विकासासाठी साखर कारखान्याची गरज आहे, असे मला प्रकर्षाने जाणवते. ज्या दिवशी खेड तालुक्यातून साखरेचा धूर निघेल, तो माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण असेल.
(शब्दांकन : अमितकुमार टाकळकर)