ताज्या बातम्यारणधुमाळी

“…त्यामुळे आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी”, आशिष शेलारांची मागणी

मुंबई | Ashish Shelar On Aditya Thackeray – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प (Vedanta-Foxconn Project) राज्याबाहेर गेल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना जबाबदार धरत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसंच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी (24 सप्टेंबर) पुण्याच्या वडगावमध्ये जनआक्रोश मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 26 सप्टेंबरची तारीख असलेल्या एका सरकारी कागदाचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या एका उत्तराची माहिती आहे. यावरून आशिष शेलार यांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आमदार राम कदम यांनी मावळमध्ये वेदांता-फाॅक्सकाॅन प्रकल्पासंदर्भात आंदोलन करू नये, अशी विनंती करणारं महाराष्ट्र औद्योगिक मंडळाचं एक पत्र आशिष शेलार यांनी केलेल्या ट्विटमध्ये शेअर केलं आहे. ‘वेदान्त-फॉक्सकॉन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा अद्याप एमओयू झालेला नाही. वेदांत फॉक्सकॉन कंपनीस महामंडळाकडून जागेचे वाटप झालेले नाही. त्यामुळे जागेचा सर्व्हे क्रमांक याबाबत माहिती देता येत नाही’, असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांता-फाॅक्सकाॅन कंपनीला ना जमीन दिली, ना कुठला करार केला. हा घ्या सरकारी पुरावा. प्रकल्प महाराष्ट्रात तुम्ही आणलाच नाही आणि गेला म्हणून ओरडता? अडीच वर्षं कंपनीला का लटकवलं? टक्केवारीसाठी वाटाघाटी सुरु होत्या का? चौकशी झालीच पाहिजे!”, अशी मागणी आशिष शेलार यांनी या ट्वीटमध्ये केली आहे.

“या प्रकरणी खोटे बोलून मराठी तरूणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी! चौकशीला समोरे जा. अजून बरेच निघेल! अन्यथा तरुणांची माथी भडकवणे, दोन समाजात तेढ निर्माण करणे या प्रकरणी कायदेशीर कारवाई सरकारने का करु नये?” असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये