‘मोदीही मला संपवू शकत’ नसल्याच्या वक्तव्यावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या…

मुंबई | Pankaja Munde – सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. तसंच त्यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत आता पंकजा मुंडे यांनी स्वत: स्पष्टीकरण दिलं आहे.
पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचं आवाहन केलं होतं. या संदर्भात उपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज असताना मोदीजींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असून यात मोदीजींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ रणधुरंकर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. तर ‘चांगले काम केले तर मोदीजी सुद्धा पराभव करू शकणार नाहीत’ असा सकारात्मक संदर्भ यामागे असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
तसंच या संदर्भात पंकजा मुंडेंनी एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त 17sep पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights आपल्या पर्यंत एक ओळ आलीच आहे. “सनसनीखेज” बातम्यातून जमले तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावं वाटल्यास या link वर आहेच.”