“स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं अन् दुसऱ्याच्या बाळाला…”, किशोरी पेडणेकरांचा भाजपला खोचक टोला

मुंबई | Kishori Pednekar On BJP- सध्या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. तसंच पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडेंनी भाजपामधील (BJP) परिस्थितीला वाचा फोडल्याचं विधान केलं आहे.
यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “मी पंकजा मुंडेंवर बोलणार नाही. कारण त्यांच्या जन्माच्या आधीपासून त्यांचे वडील, आजोबा, काका, भाऊ असं सगळं कुटुंबच राजकारणात मुरलेलं आहे. त्यांनी गोपीनाथ मुंडेंकडून राजकारणाचं बाळकडू घेतलं आहे”.
“पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील महिला आहेत. त्यांनी पक्षातील खदखद बोलून दाखवली. स्वत:च्या बाळाला बाजूला ठेवायचं आणि दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर घेऊन खाऊ-पिऊ घालून गुटगुटीत करण्याचा देशात ट्रेंड दिसतोय. त्याला पंकजा मुंडेंनी वाचा फोडली आहे”, असा खोचक टोला देखील किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.