“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, पटोलेंचा फडणवीसांना टोला; म्हणाले “दोघांच्या वादात…”

मुंबई : (Nana Patole On Devendra Fadnavis) राज्यातील तीन महिण्यापासून रखडलेल्या पालकमंत्री पदाची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शनिवार 24 रोजी जाहिर केली. या पालकमंत्री पदाच्या वाटपात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक नाही, दोन नाही, तर तब्बल सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपावण्यात आली आहे.
यानंतर राज्याच्या राजकारणात वादंग निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. विरोधकांनी या मुद्द्याला धरुन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका केल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांत चांगलीच कलगीतुरी रंगली होती. अजित पवार म्हणाले होते, “मी फक्त एका पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तर, माझी नाकी नऊ झाली होती, हे सहा जिल्ह्याची जबाबदारी कशी संभाळणार”, तर त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले होते, “मी अख्खा महाराष्ट्र संभाळलेला आहे सहा जिल्ह्याचे काय घेऊन बसलात”.
यावर आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकारने तीन महिन्यानंतर पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे सहा जिल्ह्याला एकच पालकमंत्री दिला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? सहा जिल्ह्याच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार? या दोघांच्या वादात जिल्ह्यातील विकासकामांचा बोजवारा उडाला आहे,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.