ताज्या बातम्यारणधुमाळी

“सध्या मी बेरोजगारच आहे…”, पंकजा मुंडेंची मिश्किल टिपण्णी

मुंबई | Pankaja Munde – गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे चर्चेत आहेत. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं होतं. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं होतं. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत पंकजा मुंडे यांनी स्वत: स्पष्टीकरण देत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचं सांगितलं होतं. बीडमधील त्यांच्या या विधानानंतर आता अजून एक उपहासात्मक विधान चर्चेत आलं आहे. बीडच्या एका कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडेंनी ‘मी सध्या बेरोजगारच आहे’ असं म्हटलं होतं. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

बीडच्या परळी शहरात संत भगवान बाबा प्रतिष्ठानतर्फे नवरात्रीच्या निमित्तानं सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी काल (28 सप्टेंबर) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी व्यासपीठावरून भाषण करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या (गोपीनाथ मुंडे) वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे. सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो”.

“मी राजकारणात असेन. परळीची नाही, समजा राज्यातील अनेक लोकांची नेताही असेन. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मी किनाऱ्यावर बसून काम करण्यापेक्षा मैदानात उतरून किंवा समुद्राच्या वादळात उतरून आपली नौका पार लावण्याकडे माझा कल जास्त आहे. आणि तेच कायम राहणार आहे”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पुढे बोलताना त्यांनी भगवान गडावरील एका व्यक्तीला उद्देशून मिश्किल टिपण्णी केली. “काकांनी देवीच्या कानात काय सांगितलं, तर ताईंना सांग मला काहीतरी काम द्या. मला ते ऐकून खूप आनंद झाला. कारण मी जर कुणाला काम देऊ शकते, याचा अर्थ मलाही काम मिळेल. सध्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मला तुमची प्रार्थना आवडली. हे एक तीर में दो निशाण आहे”, असं पंकजा मुंडे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये