ताज्या बातम्यारणधुमाळी

“नरेंद्र मोदी-अमित शाह यांनी लिहिलेलं भाषण मुख्यमंत्र्यांनी…”, नाना पटोलेंची खोचक टीका

मुंबई | Nana Patole On CM Eknath Shinde – काल (5 ऑक्टोबर) मुंबईतील बीकेसी मैदानावर (BKC Ground) शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा पार पडला. यावेळी केलेल्या भाषणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. तसंच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या पदयात्रेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानानांतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदेंवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

एकनाथ शिंदेंनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता नाना पटोले म्हणाले, “राहुल गांधीची पदयात्रा ही देशाच्या तिरंग्यासाठी आहे. त्यांची पदयात्रा आता तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लोक चळवळ बनली आहे. गावोच्या गावे राहुल गांधीच्या पदयात्रेत सामील होत आहेत. भरपावसात आणि भरउन्हात लोकं राहुल गांधींच्या पदयात्रेत सामील होत आहेत.”

“त्यांच्या पदयात्रेची राज्याचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने थट्टा-मस्करी करत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याचे मुख्यमंत्री कोणत्या विचारांचे आहेत, याबाबत आम्हाला काही देणं-घेणं नाही. पण महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा आहे, शाहू, फुले आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अशा पद्धतीने चेष्टा-मस्करी करत असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे” अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “काँग्रेसला त्यांच्या टिंगल-टवाळीमध्ये कसलाही रस नाही. राहुल गांधी हे आज देशाचा तिरंगा आणि संविधान वाचवण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी तळमळीने काम करत आहेत. त्यामुळे लोकं त्यांच्याशी जोडली जात आहेत. हे त्यांना बघवत नाही, विशेषत: भाजपला. मुख्यमंत्री काल दसरा मेळाव्यात वाचून भाषण करत होते. ते भाजपचं भाषण होतं. नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांनी लिहिलेलं भाषण ते वाचत होते, असं चित्र काल महाराष्ट्र पाहत होता. पण काँग्रेसला अशा पद्धतीच्या तमाशात कुठलाही रस नाही.”

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये