३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : पदार्पणात वैभवने पटकावले सुवर्ण

डायव्हिंगमध्ये मेधालीला सुवर्णपदक तर हृतिकाला ब्राँझपदक
अहमदाबाद : योगपटू वैभव श्रीरामे आणि छकुली सेलोकर यांनी या स्पर्धेतील पहिल्याच दिवशी कारकिर्द गाजवली. नागपूरच्या या दोन योगापटूंनी शुक्रवारी राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला दोन पदकांचा बहुमान मिळवून दिला. एशियन चॅम्पियनशिप मधील गोल्ड मेडलिस्ट वैभव श्रीरामे पारंपरिक योगासन प्रकारात सुवर्णपदक विजेता ठरला. तसेच महिलांच्या पारंपरिक योगासनात नागपूरच्या छकुलीने रौप्य पदकाची कामगिरी केली. यासह महाराष्ट्र संघाने यंदा प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी करण्यात आलेल्या योगासन प्रकारात गोल्डन एन्ट्री केली. तसेच नागपूरचे वैभव आणि छकुली राष्ट्रीय स्पर्धेच्या पदार्पणात पदकांचे मानकरी ठरले. मुख्य प्रशिक्षक संदेश खरे आणि संघ व्यवस्थापक सुहास पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी पदकांची कमाई केली.
महिलांच्या पारंपरिक योगासनात सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या छकुलीने सर्वोत्तम अासने करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिने महिलांच्या गटात ६२.३४ गुणांची कामगिरी करत रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. यादरम्यान तिने सुवर्णपदकासाठी झुंज दिली. उपांत्य फेरीत सर्वोत्तम आसने करून तिने फायनलमध्ये प्रवेश केला. या दरम्यान ती दुसऱ्या स्थानावर होती. छकुलीने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, वामदेव त्रिपुरासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही पारंपरिक योगासने सादर केली.

अपूर्वा पाटील (ज्युदो कांस्यपदक)
ज्युदो : अपूर्वा पाटील हिने ७८ किलोपेक्षा अधिक वजन गटात कांस्यपदक पटकावले. महाराष्ट्राची ज्युदोपटू अपूर्वा पाटील हिने ७८ पेक्षा अधिक किलो वजन गटात पहिल्या लढतीत मणिपूरच्या रोशनी देवीला पराभूत केले. दुसऱ्या लढतीत अपूर्वा पाटीलने तामिळनाडूच्या देवधर शनीला हरवत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य सामन्यात अपूर्वा पाटीलला पंजाबच्या मनप्रीतकडून पराभव स्वीकारावा लागला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर अपूर्वा पाटील ही कांस्यपदकाची लढत खेळली. त्यात अपूर्वा पाटील हिने मणिपूरच्या उमा चौहानला नमवून कांस्यपदक जिंकले. अपूर्वाच्या कांस्यपदकामुळे ज्युदो खेळात महाराष्ट्राने पदकाचे खाते उघडले. महाराष्ट्राच्या गौतमी कांचन (६३ किलो गट) व इशांत कनोजिया (६० पेक्षा कमी वजन गट) या ज्युदोपटूंना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

मेधाली रेडकर (डायव्हिंग सुवर्णपदक)
डायव्हिंग : महाराष्ट्राच्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

छकुली सेलोकर (योगासन रौप्यपदक)
मुष्टीयु्द्ध : महाराष्ट्राच्या आर्या कुलकर्णी व हरिवंश तावरी या खेळाडूंना स्पर्धेतील आपापल्या वजनी गटात पहिल्याच लढतीत पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेतील महिलांच्या ५० ते ५२ किलो गटात मणिपूरच्या ओजीबाला थोनाजम या अनुभवी खेळाडूने आर्या हिला ५-० असे पराभूत केले. ओजीबाला हिने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. आर्या पेक्षा ती जास्त ताकदवान होती. तरीही आर्या हिने शेवटपर्यंत तिला चांगली लढत दिली. पुरुषांच्या ६० किलो गटात हरिवंश याच्यापुढे सेनादलाच्या हितेश कुमारचे आव्हान होते. हितेश हा अतिशय अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे त्याचे पारडे जड होते. तथापि हरिवंश याने सुरुवातीपासूनच त्याला कौतुकास्पद लढत दिली. ही लढत हितेश याने ५-० अशी जिंकली.
सॉफ्ट टेनिस : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सॉफ्ट टेनिस या खेळाच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सलामीच्या सांघिक लढतीत पराभव स्वीकारावा लागला. यजमान गुजरात संघाने महाराष्ट्राचा ५-२ असा पराभव केला. महाराष्ट्र संघाकडून पदकाची अपेक्षा होती. परंतु, सलामीच्या लढतीत गुजरात संघाकडून महाराष्ट्र संघास पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे महाराष्ट्र संघाचे सांघिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सांघिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुल उगलमुगले व ऋतुराज सुवर्णकार या जोडीला गुजरातच्या अनिकेत पटेल व मोहित बोंद्रे या जोडीकडून २-५ असा पराभव स्वीकारावा लागला. दुहेरी सांघिक सामना नऊ गेम्सचा झाला. तसेच एकेरीत महाराष्ट्राच्या विशाल जाधवला अजय सुधाकरकडून २-४ असे पराभूत व्हावे लागले. एकेरीचा गेम सात गेम्सचा झाला. ऋतुराज सुवर्णकार व राहुल उगलमुगले यांचे सांघिक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी शनिवारी विशाल जाधव हा एकेरीत खेळणार आहे.
सॉफ्टबॉल : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच समावेश करण्यात आलेल्या सॉफ्टबॉल प्रकारात महाराष्ट्र संघाकडे सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिले जात होते. सलामीच्या लढतीत महाराष्ट्र संघाने मध्य प्रदेश संघाविरुद्ध १-० होमरनने आघाडी घेतली आहे. त्यानंतर मुसळधार पावसामुळे सामना स्थगित करण्यात आला. मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने पहिल्या डावात १-० अशी आघाडी घेण्यात यश मिळवले. जयेश मोरे याने होमरन काढून संघाची स्थिती भक्कम केली. पवन गुंजाळ याने पिचिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. पहिल्या डावात महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी वर्चस्व गाजवले आहे. मुसळधार पावसामुळे या लढतीसह सर्व सामने स्थगित करण्यात आले. आता हा सामना शनिवारी होणार आहे.

वैभव श्रीरामेने पारंपरिक आसन प्रकारात सर्वांचे लक्ष वेधले. त्याने विभक्त विपरीत शलभासन, परिवर्त शिव लिंगरासन, एकपाद त्रिमुकूटत्तानासन, कैलासआसन, उर्दमुख टीटीभासन ही लक्षवेधी आसने केली. त्यामुळे त्याला ६१.८४ गुणांची सर्वोत्तम कामगिरी करता आली. यासह तो सुवर्ण पदक विजेता ठरला. नागपूर येथील वैभव श्रीरामे याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र अशाही परिस्थितीत त्यांनी घराची जबाबदारी सांभाळत. योगासनातील आपला छंद अविरतपणे जोपासला. त्याचे वडील नागपूर शहरांमध्ये इलेक्ट्रिशनचे काम करतात. त्यामुळे त्यांना हातभार लावण्यासाठी वैभवलाही अनेकदा काम करावे लागते. अशाच प्रचंड मेहनतीचा अफाट वैभव राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.