दिवाळीपूर्वी समृद्धीचा पहिला टप्पा सुरु होणार?

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार दिवाळीपूर्वी राज्यातील जनतेला भेटवस्तू देण्याची शक्यता आहे. राज्याचें उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. यापूर्वी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याची चर्चा होती. मात्र यावेळीही विलंब झाला असून आता दिवाळीपूर्वी म्हणजेच २३ ऑक्टोबरला पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडणारा महाकाय प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचा एमएसआरडीसीचे एमडी राध्येशाम मोपलवर यांनी गुरूवारी आढावा घेतला. समृद्धी महामार्गावरील सुरक्षा, टोल नाके, रुग्णवाहिका , स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग सिस्टीम, सुरक्षा रक्षक आदींचा मोपलवारांकडून आढावा घेण्यात आला आहे. तसेच बुलढाण्यातील पॅकेज सातमध्ये थांबून त्यांनी अभियंत्यांना काही सूचनाही केल्या. दिवाळीपूर्वीच नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. तारीख देऊनही समृद्धीचा लोकार्पण होऊ शकला नसल्यामुळे, नवीन लोकार्पण तारखेची घोषणा करताना गोपनीयता पाळली जात आहे.
शिर्डी ते नागपूर समृद्धी महामार्ग महामार्ग शंभर टक्के वाहतुकीसाठी सुरू करता येऊ शकतो. मात्र महामार्ग सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालय घेणार असल्याने आपल्याला त्याबद्दल निश्चित काही सांगता येणार नाही. त्यामुळे येत्या दिवाळीच्या आधी समृद्धी महामार्गाच्या नागपूर शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होईल का नाही याकडे लक्ष लागून आहे.
दरम्यान, या समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होणार आहे. नागपूर मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशाने ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या ‘समृद्धी महामार्गाची’ घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.