“…त्यामुळे त्यांनी हा चांगला विचार केला असावा”, भाजपच्या माघारीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
मुंबई | Ajit Pawar – भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजपने मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलेल्या पत्रामुळे वळण मिळालं. अखेर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला असून यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, “नांदेडची पोटनिवडणूक झाली, पंढरपूरला पोटनिवडणूक झाली. यावेळेचं सर्व वातावरण लक्षात घेता. दिवाळी तोंडावर आहे हे पाहता. या सर्व धावपळीच्या काळामध्ये त्यांच्या विधवा पत्नीला उमेदवारी मिळाली होती. त्याही कामाला लागल्या होत्या. त्याही घरोघरी फिरत होत्या. सर्वांनी आवाहन केल्यामुळे कदाचित हा चांगला विचार त्यांनी (भाजपने) केला असावा,” असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज ठाकरेंच्या पत्रानंतर फडणवीसांनी सर्वांची मतं लक्षात घेऊन निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं होतं. यानंतर भाजप नेत्यांच्या बैठका सुरू झाल्या होत्या. रविवारी रात्री फडणवीसांच्या घरी पार पडलेल्या या बैठकीमध्ये आशिष शेलार, अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार मुरजी पटेल यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित होते. भाजपचं स्थानिक नेतृत्व ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं आशिष शेलार आणि मुरजी पटेल यांनी फडणवीस यांना कळवलं होतं. यानंतर सकाळीही देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेघदूत’ बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणूक अर्ज घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
One Comment