ताज्या बातम्यारणधुमाळी

ठाकरे कुटुंबियांच्या मालमत्तेची ईडी-सीबीआयकडून चौकशी करा, कोर्टात याचिका

मुंबई | Uddhav Thackeray – राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी ईडी आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. आज (19 ऑक्टोबर) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. ही याचिका दादरस्थित गौरी भिडे यांनी केली आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिका केल्याचा दावा गौरी भिडे यांनी केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेतून आरोप करण्यात आला आहे की, उद्धव ठाकरे यांची संपत्ती ही भ्रष्टाचार आणि गैरमार्गानं जमा केलेली बेहिशेबी मालमत्ता आहे. याविरोधात त्यांनी 11 जुलै 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रार दाखल केलेली आहे, मात्र त्यावर आजवर काहीच कारवाई झालेली नाही. ठाकरेंच्या भ्रष्टाचार आणि मनीलाॅन्ड्रिंगचे पुरावे असूनही कारवाई होत नाही, असा आरोप करत याचिकेत केंद्रीय गृह मंत्रालय, केंद्रीय अर्थ मंत्रालय, सीबीआय, मुंबई पोलीस आयुक्त, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे या सर्वांनी प्रतिवादी करण्यात आलेलं आहे. या सर्वांनी भारतीय राज्यघटना, आयपीसी, सीआरपीसी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, लोकप्रतिनिधी कायदा या सगळ्यांचं उल्लंघन केलेलं आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत, आदित्य ठाकरे हे त्यांच्याच कॅबिनेटमधले महत्त्वाचे मंत्री होते. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणूनच त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि आयपीसीचे कलम 21 हे लागू होतात. त्याशिवाय लोकप्रतिनिधी कायदादेखील लागू होतो. याशिवाय यातील प्रतिवादी क्रमांक 7 आणि 8 रश्मी ठाकरे, तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळच्या नातेवाईक असल्यानं त्यांचीही चौकशी या कायद्यानुसार व्हायला हवी.

दरम्यान, सामना आणि मार्मिक प्रकाशित करणारा ठाकरे कुटुंबियांच्या मालकीचा ‘प्रबोधन’ प्रकाशनचा छापखाना जिथे आहे त्याच्या शेजारीच गौरी भिडे यांच्या आजोबांचा ‘राजमुद्रा’ प्रकाशन हा छापखाना होता. केवळ सामना आणि मार्मिकच्या विक्रीतून एवढी अफाट संपत्ती गोळा होणं, मातोश्री 2 सारखी टोलेजंग इमारती उभी करणं, अलिशान गाड्या, फार्महाऊसेस घेणं निव्वळ अशक्य आहे. कारण आपलाही हाच व्यवसाय, तेवढेच परिश्रम असल्यानं मिळकतीत जमीन अस्मानाचा फरक कसा? असा सवालही याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

वर्तमानपत्रांची छपाई, सर्क्युलेशन याचा हिशोब ठेवत त्याच्या दर्जाचे ग्रेडिंग करणारी एसीबी ही संस्था आहे. गौरी भिडे यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा दावा आहे की, सामना आणि मार्मिक यांचे एसीबी ऑडिटच झालेलं नाही. तसंच कोरोना काळातही प्रबोधन प्रकाशनचा 42 कोटींचा टर्नओव्हर आणि 11.5 कोटींचा नफा कसा?, त्यामुळे हा पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत केलेल्या बेहिशोबी पैसा आहे, असा अरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये