“गृहमंत्र्यांकडून हे आदेश…”, भास्कर जाधवांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मुंबई | Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis – ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील घरावर काल (18 ऑक्टोबर) रात्री हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती”, असं जाधव म्हणाले. नवी मुंबईत आयोजित ठाकरे गटाच्या ‘तडीपार मोर्चा’त सहभागी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी भास्कर जाधव म्हणाले, “गेल्या 40 वर्षांपासून मी राजकारणात आहे. मी कधीही सुरक्षा मागितली नाही. मी माझा शेतीचा व्यवसाय करून मी राजकारण करतो. त्यामुळे मला सुरक्षेची गरज नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालिन गृहमंत्र्यांनी मला सुरक्षा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार माझ्या मुंबईतील आणि गावातील घरी सुरक्षा देण्यात आली होती. मात्र, काल रात्री अचानक माझ्या सुरक्षेत कपात करण्यात आली आणि माझ्या घरावर हल्ला झाला. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून असा प्रकार होईल, अशी मला अपेक्षा नव्हती. ते पोलीस खात्याचे प्रमुख आहेत. मुख्यमंत्री असं काही करतील असं मला वाटत नाही. गृहमंत्र्यांकडून हे आदेश आले असावे आणि माझं सुरक्षा कवच काठलं असावं.”
“असे हल्ले करून तुम्ही मला शांत करू शकत नाही. मी जिवंत आहे, तोपर्यंत मी बोलत राहणार. ईडी, सीबीआय, पोलिसांचे छापे, एसीबीचे छापे, पक्ष फोडून तुमचे समाधान झाले नाही, म्हणून तुम्ही विरोधी पक्षातील बोलणारी माणसं मारून जर तुमचा पक्ष वाढणार असाल, तर निश्चितपणे मला मारा. मात्र, मी माघार घेणारा कार्यकर्ता नाही”, असंही जाधव म्हणाले.
“नारायण राणेंच्या मोठ्या कार्ट्यानं माझ्या दिवंगत वडिलांबाबत, माझ्या पत्नी आणि मुलांबाबत अपशब्द वापरले. आज ते आम्हाला सुसंस्कृत राजकारण शिकवत आहेत. खरं तर राज्याच्या सुसंस्कृत राजकीय परिस्थितीला कोणी तिलांजली दिली असेल, तर या तीन राणेंनी दिली आहे.”, असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला आहे.