दिवाळीतील घराचे स्वप्न अपूर्ण

मुंबई : दिवाळीनिमित्त म्हाडाकडून काढण्यात आलेली सोडत रद्द करण्यात आली आहे. म्हाडाचे सॉफ्टवेअर अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने दिवाळीला लॉटरी निघणार नाही, अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. लॉटरी रद्द करताना पुणे आणि कोकण विभागात एकाच वेळी लॉटरी काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडाने घेतला आहे. या सोडतीची पुढील तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. त्यामुळे राज्यभरातील अनेकांची निराशा झाली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे म्हाडाकडून आतापर्यंत अनेक घरांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या सोडतीने नवा विक्रम केला आहे. आतापर्यंत २७ हजार सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. सीईओ नितीन माने-पाटील यांच्या प्रयत्नांमुळे म्हाडाने हा मोठा विक्रम केला आहे. येत्या काही दिवसांत लॉटरी जाहीर होणार असून म्हाडाच्या माध्यमातून पुण्यातच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूरमध्येही सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. याआधी १८ ऑगस्टला पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार घरांची लॉटरी निघाली होती.
पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ५२११ घरांसाठी म्हाडाकडून १८ ऑगस्ट रोजी सोडत काढण्यात आली होती. या सोडतीद्वारे ५२११ अर्जदार विजेते ठरले होते. त्यानंतर पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करुन त्यांना घरांचा ताबा देण्यात आला.
सॉफ्टवेअर अपडेटमुळे सोडत रद्द
मुंबई, पुणे आणि कोकण या तीनही विभागांची सोडत रद्द करण्यात आली आहे. सध्या सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम सुरू असून, हेच कारण सांगून म्हाडाने अचानक लॉटरी रद्द केली आहे. राज्यभरातील सर्वसामान्य जनता या सोडतीची वाट पाहत होती. अचानक रद्द केल्याने त्यांचे दिवाळीत घराचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.