राष्ट्रवादीचे आंदोलन : रेशनधारक धान्यापासून अद्यापही वंचित – ‘शंभर रुपयांत नाही मिळत किट हिच भाजपची रीत’

पुणे : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने दिवाळीनिमित्त जाहीर केलेल्या ‘शंभर रुपयात किराणा किट’ या फसव्या योजनेच्या निषेधार्थ व अन्नधान्य वितरण व्यवस्था पुन्हा पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दांडेकर पूल येथे आंदोलन करण्यात आले.
मोठमोठी आश्वासने देऊन ती पूर्ण न करणाऱ्या या भाजपवाल्यांनी नेहमीप्रमाणेच या वेळीही राज्यातील जनतेला फसविलेच आहे. दिवाळी सुरू होऊन सुद्धा अजूनही कार्डधारकांना धान्य मिळालेले नाही.
शंभर रुपयांत किराणा किटची घोषणा केली, पुरवठादाराने किराणा किट उपलब्ध देखील करून दिल्या; परंतु या किटवर फसवणुकीचे बोधचिन्ह असणाऱ्या शिंदे -फडणवीस यांचा फोटो नसल्यामुळे या किट वितरित करण्यात आल्या नाही. अखेर गरिबांना दिवाळीच्या एक दिवस अगोदर देखील संबंधित किट मिळालेल्या नाहीत.
प्रगत व विकसित समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. एकीकडे ओला दुष्काळसदृश परिस्थिती आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे दिवाळी आनंदाने व उत्साहात साजरी करता आली नव्हती. या वर्षी ती आनंदात साजरी करता येणार अशी खोटी आश्वासने देत शिंदे- फडणवीस सरकारने ही लोकप्रिय घोषणा केली. परंतु आजही गरिबांना संबंधित किट मिळू शकलेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या गोष्टीचा निषेध करते महाविकास आघाडी सरकारच्या काळात कडक लॉकडाऊन असताना देखील सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्था अत्यंत सुनियोजितपणे सुरू होती. या सरकारने लोकप्रिय घोषणांच्यापायी संबंधित व्यवस्था बिघडवली असून जी काही आश्वासने दिली होती ती देखील यांना पूर्ण करता आली नाहीत. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सदर बाबीचा निषेध व्यक्त केला. येत्या दोन दिवसांत सार्वजनिक धान्य वितरणप्रणाली पूर्ववत सुरू न झाल्यास पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील.
या प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, संतोष नांगरे, सौ. मृणालिनी वाणी, सौ. प्रिया गदादे, विपुल मैसुरकर, बाळासाहेब अटल, विजय बागडे, समीर पवार, शशिकला कुंभार, अमोल ननावरे, मोनहाज शेख, संजय दामोदरे, राहुल गुंड, प्रदीप शिवशरण, शिवम ईभाड, संकेत शिंदे व इतर प्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.