BMC मध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था महाभारतातील चक्रव्यूहमध्ये अडकलेल्या अभिमन्यूसारखी होणार?

मुंबई : (Eknath Shinde On Uddhav Thackeray) शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीतही उद्धव ठाकरेंसमोर सत्ता टिकवण्याचं तगडं आव्हान असणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था चक्रव्यूहमध्ये फसलेल्या अभिमन्यूसारखी होऊ शकते. महाभारतामध्ये अभिमन्यू जसा चक्रव्यूहमध्ये फसला होता, त्याला नातेवाईक आणि जवळच्या लोकांनी चक्रव्यूहमध्ये फसवले होते तशीच काहीशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्यावर ओढावली आहे. उद्धव ठाकरे यांचे आधीचे सहकारी त्यांच्यासाठी चक्रव्यूह तयार करत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिपोत्सवच्या निमित्ताने एकत्र आले होते. एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप राज्यातील पुढील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्र लढणार यात शंका नाही. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची तयारी करा, असे निर्देश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. पण भाजप मनसेसोबत पडद्यामागून काहीतरी राजकीय खेळी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उघड किंवा छुप्या पाठिंब्याच्या मदतीनं राज ठाकरे आपल्या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची संधी शोधत आहेत.