MCA मध्ये आशिष शेलारांना दिलेल्या पाठिंब्याचा शरद पवारांनी केला खुलाचा; म्हणाले…
मुंबई : (Sharad Pawar On Ashish Shelar) राज्यात भाजप सत्तेत आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेस हा विरोधी पक्ष आहे. मात्र राजकारणात कोणतीही गोष्टी अशक्य नसते, त्याचा प्रत्यय तीन दिवसापुर्वी पार पडलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आला. कारण शरद पवार आणि आशिष शेलार यांच्या पॅनलमध्ये युती झाली अन् सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे.
दरम्यान, एका पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी मुंबई क्रिकेट असोसिसएशनची निवडणूकीच्या युतीसंदर्भात भाष्य केलं आहे. “आशिष शेलार हे याआधीही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. काही क्षेत्रं अशी असतात, जिथे राजकारण आणायचं नसतं. क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही राजकारण आणत नाही,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “खरंतर लोकांना हे माहिती नाही की मी बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा गुजरातचे प्रतिनिधी नरेंद्र मोदी होते. मोदी माझ्या बैठकीला हजर होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हाच अरुण जेटली दिल्लीचे तर आत्ता केंद्रीय मंत्री असलेले अनुराग ठाकूर हिमाचल प्रदेशचे अध्यक्ष होते. त्यामुळे मी देशाचा अध्यक्ष आणि हे सगळे राज्यांचे अध्यक्ष असं आम्ही सर्वांनी तेव्हा एकत्र काम केलं. तेव्हा लोकांना ते लक्षातही आलं नाही. पण यावेळी त्याची चर्चा सुरू झाली. तात्पर्य एकच, की या ठिकाणी राजकारण आणायचं नाही,” असा किस्सा सांगत शरद पवारांनी रंगणाऱ्या चर्चेला पुर्णविराम दिला.