संत चरित्र पोचविण्यासाठी डिजिटलायझेशनचे अनोखे पाऊल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते होणार प्रकाशन
पंढरपूर: पुढच्या पिढीची भाषा ही डिजिटल एडिशनची भाषा आहे असे म्हणतात. पुस्तके वाचनाच्या बरोबरीनेच मोबाईल मधील ॲनिमेशन आणि फिल्म यावर नव्या पिढीचा कौल आहे. हे ओळखून वारकरी सांप्रदायाची संत चरित्रांचे अॅनिमेशन्स करून त्याद्वारे नैतिक शिक्षण देणाऱ्या सुंदर कथा आता ॲनिमेटेड फिल्मच्या माध्यमातून पोचविण्यात येणार आहेत. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या माधवी निगडे यांनी त्यांच्या वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने याची निर्मिती केली आहे .
शुक्रवारी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पहाटेच्या महापुजेवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ॲनिमेटेड फिल्मचे लोकार्पण होणार आहे.
या प्रयोगाबाबत राष्ट्रसंचारशी बोलताना निगडे यांनी सांगितले की, “महाराष्ट्र ही संतभूमी. त्यामुळेच आपल्याला संतांची फार उज्वल परंपरा आहे. मात्र, दुर्दैवाने नव्या पिढीपर्यंत या परंपरा अपेक्षेप्रमाणे पोचत नाहीत. त्यामुळे त्यांचे अपेक्षित प्रबोधन होत नाही. या बाबींचा विचार करून मुलांना वारकरी सांप्रदायिक संतांची माहिती लहानपणापासून व्हावी, त्यांच्या विचारातून, चरित्रांमधून त्यांना जीवन अधिक सक्षमपणे जगता यावे, यासाठी ॲड. माधवी निगडे वेल्फेअर फाउंडेशनतर्फे वारकरी संत परंपरेतील संतांच्या चरित्रातील प्रसंगांवर आधारित ॲनिमेटेड फिल्म सादर केली जाणार आहे. लवकरच त्याचे प्रकाशन करण्यात येईल. वारकरी संप्रदायाचा पाया रचणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रापासून याला सुरुवात करण्यात येणार आहे. या अॅनिमेटेड फिल्ममध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील काही प्रसंगांची माहिती देण्यात येणार आहे. त्यातून नव्या पिढीपर्यंत संतांची माहिती पोचेल. त्यांचे आदर्श विचार उपयुक्त ठरू शकतील.” अशी माहिती अॅड. निगडे यांनी दिली.