“…तेव्हा शिंदे-फडणवीस सरकार पडणार”, जयंत पाटलांचं खळबळजनक वक्तव्य

शिर्डी | Jayant Patil – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. तसंच हे नवीन सरकार आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. यादरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार, याबाबत भाकित केलं आहे. आजपासून (4 नोव्हेंबर) शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं दोन दिवसीय मंथन शिबीर सुरू होत आहे. त्या अनुषंगानं राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार-खासदार शिर्डीत दाखल होत आहेत. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात या शिबिरात विचारमंथन होणार आहे. मात्र, हे शिबीर सुरू होण्याआधीच जयंत पाटलांनी खळबळजनक दावा केला आहे.
काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील काही नेतेमंडळींनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) फुटणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यावर आता जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. “आज महाराष्ट्रात सगळ्यात खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही”, असा विश्वास पाटलांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असं सूचक भाकित केलं आहे. “आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं”, असं म्हणत जयंत पाटलांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना खोचक टोला लगावला.
“शिर्डीला आम्ही आहे की तिथे एक अधिवेशन झालं, सरकार पडलं. हे मान्य आहे. पण आता हे अधिवेशन झाल्यावर सरकार पडणार. पक्ष कसा फुटेल? आज महाराष्ट्रात सगळ्यता खंबीर पक्ष राष्ट्रवादीच आहे. तो फुटायचा प्रश्नच नाही. आता काँग्रेसचं अधिवेशन झालं, तेव्हा माहिती नाही कुणाचं सरकार होतं. पण ते पडलं. आता आमचं अधिवेशन झालं तर सध्याचं सरकार पडेल”, असं जयंत पाटील म्हणाले.