![म्हणे मध्यावधी.! editorial](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/editorial-780x470.png)
मध्यावधी निवडणूक होणार, असे संजय राऊतच नव्हे तर उद्धव ठाकरेही सांगत आहेत.पण मध्यावधीसाठी आपण किती तयार आहोत, याचा अंदाज त्यांना आहे का ? सध्या आपल्या पक्षाची परििस्थती सावरणे हे उद्दिष्ट दोन्ही प्रादेशिक पक्षांनी ठेवले पाहिजे. आणि म्हणे मध्यावधीला तयार व्हा..!
सव्वाशे दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे राज्यातील शीर्षस्थ नेते सरकार पडणार असे महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलत असत. अगदी सरकार स्थापन झाल्यापासून ते शंभर सव्वाशे दिवसांपर्यंत दर महिन्याला चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, प्रवीण दरेकर, राम कदम ही मंडळी सरकार पडण्याच्या तारखा किंवा दिवस सांगायचे. त्या दिवसांमध्ये सरकार पडले नाही. तर महाविकास आघाडी, सरकार भाजपला सरकार पाडता आले नाही; आमचे सरकार भक्कम आहे. आमच्यात एकी आहे, असे सांगायचे.
अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी एकदाच सांगितले की, यांचे सरकार कधी पडेल हे त्यांना पडलेले ही समजणार नाही. परिस्थिती, वस्तुस्थिती तशीच घडली. उद्धव ठाकरे यांच्या डोळ्याखालून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार निघून गेले. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, गृहमंत्रालयाला त्याचा थांगपत्ता लागला नाही. सरकार पडले.केवळ सरकार पडले एवढेच नव्हे, तर उद्धव ठाकरे यांना आपला पक्ष वाचवण्यासाठी अक्षरशः पळापळ करावी लागली. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. तर मूळ मुद्दा हा आहे की आता महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील संजय राऊत, सुषमा अंधारे आणि स्वतः उद्धव ठाकरे मध्यावधी निवडणुका होणार.
हे सरकार जाणार अशा हाकाट्या पिटत आहेत. यामध्ये संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासह शिवसेनेतील उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी राजी करण्यात बरेच हेलपाटे मारले.बरेच परिश्रम घेतले. वाईटपणा घेतला. त्यामुळे त्यांच्या बोलण्याची केवळ दखल घेणे इथपर्यंतच ते पात्र आहेत. मात्र सुषमा अंधारे यांची एकूण व्यक्तिमत्व, त्यांचा अभ्यास, त्यांचे शिवसेनेतील स्थान या सगळ्याचा विचार केला तर त्यांनी मध्यावधी निवडणूक होणार असल्याची माहिती त्यांनी देणे हा प्रकार अदखलपात्र आहे. उद्धव ठाकरे हे संजय राऊत आणि शरद पवार यांच्याकडून आलेली माहिती आपल्या शिवसैनिकांना आणि राज्यातील जनतेला देत असल्यामुळे आणि एकेकाळी ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे जाता जाता लक्ष देण्याइतपतच त्यांच्या, तयारीला लागा या संबोधनाचा विचार करता येईल.
भारतीय जनता पक्ष सध्या कोणत्याही परिस्थितीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर प्रथम देशभरात राज्या राज्यांमध्ये आणि नंतर केंद्रामध्ये सत्ता स्थापन करण्याच्या तीव्रतम कृतिशील विचारात आहे. त्याकरता जे काही घडवता येईल ते घडवणे; हे त्यांचे सध्याचे कार्य आहे. एक पाऊल मागे घेणे किंवा चार पावले पुढे जाणे या सगळ्याचा विचार ते सध्या करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रादेशिक पक्षांना खुंटीवर टांगून ठेवण्याच्या हालचाली भारतीय जनता पक्षाने सुरू केले आहेत. सहाजिकच मध्यावधी निवडणूक लावणे हे पूर्णपणे भाजपच्याच हातात आहे, किंवा मुदत पूर्ण करणे हा पण त्यांचाच विचार असू शकतो.
त्यापुढे जाऊन मध्यावधी निवडणूक लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची निवडणूक लढवण्याची कितीशी ताकद आहे. याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. शरद पवार याबाबत प्रतिक्रिया देत नाहीत किंवा अशा सवंग घोषणाही करत नाहीत. याचे कारण त्यांना त्यांच्या ताकतीचा अंदाज आहे. निवडणुकीपूर्वी कष्ट घेण्याऐवजी निवडणुकीनंतर घेतलेले कष्ट किमान दोन अडीच वर्ष सत्ता मिळवून देऊ शकतात. हे त्यांनी आजपर्यंत प्रत्यक्षात आणलेले गणित आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले असले तरी आपल्यामागे कोण, कसे, का याचा अंदाज त्यांनी प्रथम घेतलाच पाहिजे.