“…म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा”, आशिष शेलारांचं टीकास्त्र
!["...म्हणून राहुल गांधींचं विधान म्हणजे बेअक्कलपणा", आशिष शेलारांचं टीकास्त्र rahul gandhi ashish shelar](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/rahul-gandhi-ashish-shelar-780x470.jpg)
मुंबई | Ashish Shelar On Rahul Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राहुल गांधींनी केलेल्या विधानानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. तसंच भाजपनं राहुल गांधींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामध्ये भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकरांविषयी लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत राहुल गांधींवर निशाणा साधला. “इंदिरा गांदी असं लिहितात, भारताचे सुपुत्र हे सावरकर आहेत. त्यांचा उल्लेख वीर सावरकर म्हणून त्या करतात. ज्या वीर शब्दावर स्वत: राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते त्यांनी त्यांच्या आजीचं पत्रही वाचलेलं नाही. पुढे इंदिरा गांधी यांनी म्हटलं आहे की, सावरकरांचं युद्ध अतिशय धाडसी होतं. ब्रिटिश सरकारच्या विरोधातील युद्धात त्यांची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केलं आहे”, असं आशिष शेलार म्हणाले.
“राहुल गांधींनी नेहरूंना वाचलेलं नाही, इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढ्या पुरताच अभ्यास त्यांनी केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे. राहुल गांधींचं विधान हा बेअक्कलपणा आहे म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो”, अशी टीका आशिष शेलार यांनी राहुल गांधींवर केली आहे.
2 Comments