पुणे : चेतनेचे खरे स्वरूप ज्ञान आणि प्रज्ञानातच आहे. अंतिम सत्य काय आहे, हेच शोधण्याचा प्रयत्न मानव करीत असतो. आनंद हा सदैव मानवजातीला लोहचुंबकासारखे आकर्षित करीत असतो. त्यामुळे सत् चित आनंद हेच अंतिम सत्य आहे, असे विचार जागतिक कीर्तिचे संगणक तज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस अँड अल्टिमेट रियॅलिटी, पुणे तर्फे देशात प्रथमच आयोजित ‘कॉन्शियसनेस : द अल्टिमेट रियॅलिटी’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते. तसेच एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस – द अल्टिमेट रियॅलिटीचे संचालक डॉ. जयंत खंदारे व प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. दीपक रानडे यावेळी उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी ही परिषद आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांनी सांगितलेला मार्गच जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. एस.पी. शुल्का, डॉ. दीपक रानडे, डॉ. अमित चौधरी, मोहन उत्तरवार, डॉ. संजय उपाध्ये, प्रा. सिध्दार्थ सिंग, डॉ. एस.एन. पठाण, राजेश भूतकर, गिरीष अत्रे, डॉ. राघव कोली आणि डॉ. जयंत खंदारे यांनीही विचार मांडले. डॉ. सुमन कौल यांनी आभार मानले.