“…तर निलम गोऱ्हे शिवसेनेत नसत्या”, नारायण राणेंच्या वक्तव्यावर निलम गोऱ्हे म्हणाल्या, “चिंटूचे जोक…”
!["...तर निलम गोऱ्हे शिवसेनेत नसत्या", नारायण राणेंच्या वक्तव्यावर निलम गोऱ्हे म्हणाल्या, "चिंटूचे जोक..." neelam gorhe narayan rane](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/neelam-gorhe-narayan-rane-780x470.jpg)
मुंबई | Neelam Gorhe On Narayan Rane – विधान परिषद उपसभापती डाॅ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) या शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शुक्रवारी (18 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील ट्रायडंट हाॅटेलमध्ये भेट झाली. या भेटीनंतर एकच खळबळ उडाली. यादरम्यान, टीव्ही-9 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गोऱ्हे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं. एकनाथ शिंदेंसोबतची भेट ही योगायोग असल्याचं नीलम गोऱ्हेंनी म्हटलं आहे. तसंच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) केलेल्या दाव्यासंदर्भात देखील भाष्य केलं.
यावेळी नीलम गोऱ्हे यांना नारायण राणेंनी त्या शिवसेनेमध्ये (Shivsena) नाराज असल्याचं विधान केल्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. “नारायण राणे म्हणाले की नीलमताई शिवसेनेत नाराज आहेत. मीच त्यांना शिवसेनेत थांबवलं नाहीतर त्या आत्तापर्यंत शिवसेनेत राहिल्या नसत्या”, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर निलम गोऱ्हे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं.
“मला वाटतं चिंटूचे जोक असे जे विनोद असतात तसा हा प्रकार आहे. राणेंचं विधान फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. नारायण राणे आणि माझं मागील पाच-सहा वर्षांमध्ये कधी बोलणंही झालं नाही. ते 2015-16च्या सुमाराला विधानपरिषदेचे सदस्य होते. त्यावेळेला बोलताना आम्ही केवळ जय महाराष्ट्र किंवा नमस्कार वगैरे बोलायचो. एकदा भाषण झाल्यानंतर मला आणि अनिल परब यांना सांगून गेले होते की चांगलं बोललात तुम्ही. यापलीकडे माझा नारायण राणेंशी काहीही संवाद किंवा संपर्क नाही. त्यामुळे त्यांना असं का भासतंय याची मला खरंच कल्पना नाही”, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
“नारायण राणेंनी ज्यावेळी 2004 मध्ये शिवसेना सोडली त्यानंतर त्यांच्याशी माझी औपचारिक काय अनौपचारिक भेट सुद्धा झालेली नाही. कुठे कार्यक्रमातही तसा संबंध येत नाही. त्यामुळे मनाने अंदाज बांधून ते काहीतरी बोलले असतील. त्यात काही तथ्य नाही असं मला वाटतं,” असंही नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.