ताज्या बातम्यारणधुमाळी

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार बदलण्यात एक्सपर्ट त्यामुळे…”, रामदास आठवलेंचं सूचक वक्तव्य

पिंपरी चिंचवड | Ramdas Athawale – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. तसंच हे सरकार लवकरच पडणार असंही विरोधकांकडून म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार पडेल या अफवांवर विश्वास ठेवू नका. कारण पुढील 20 वर्ष हे सरकार पडणार नाही, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या 43व्या अधिवेशनात बोलत होते.

यावेळी रामदास आठवले म्हणाले, “हे सरकार काही लवकर जाणार नाही. अनेकजण म्हणत आहेत की हे सरकार जाणार आहे. जाणार असतं तर हे सरकार आलं असतं कशाला? हे सरकार जाण्यासाठी आलेलं नाही. हे सरकार पुढील 20 वर्ष टिकणार आहे. ह्या सरकारकडून अनेक अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळे हे सरकार बदललं आहे. आत्ताचं सरकार पडेल अशी अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. कोणामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही. सर्वांना मंत्रीपदं मिळणार नाहीत. मनात नाराजी असते. प्रत्येकाला वाटतं सत्ता आपल्याला मिळाली पाहिजे पण ती मिळत नाही. मंत्रीमंडळ हे 40-45 मंत्रीपदांचं असणार आहे. त्यामुळे सर्वांना संधी मिळेलच असं नाही. विस्तार झाला की लोकं नाराज होतील आणि सरकार पडेल अशी वलग्ना विरोधकांकडून केली जाईल.”

“पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बातमी खरी असते पण ती कोणाला तरी टोचणारी असते. त्यामुळे अनेकवेळा पत्रकारांवर हल्ले होतात. पत्रकारांचे खून होतात म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांना संरक्षण देण्याचा कायदा केला आहे. कायद्यानं जातीय व्यवस्था संपविण्यात आली आहे तरी अजूनही दलितांवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे कायदे करून चालणार नाहीत त्याची अमंलबजावणी होणं गरजेचं आहे. जे अत्याचार करतील त्यांना कठोर शासन झालं पाहिजे. त्यामुळे अत्याचाराची संख्या कमी होईल”, असंही रामदास आठवले म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये