“महाराष्ट्र युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून…”, गुजरात निकालानंतर रोहित पवारांची खोचक टीका

मुंबई | Rohit Pawar – भाजपला बहुमत मिळणार असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपनं या निवडणुकीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकत विक्रमी विजय मिळवला आहे. यानंतर राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपला खोचक शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
रोहित पवार यांनी ट्विटद्वारे भाजपवर (BJP) खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपचं ‘हार्दिक’ अभिनंदन. तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन!”
पुढे ते म्हणाले, “गुजरातचा निकाल म्हणजे PM साहेबांच्या 31 व गृहमंत्र्यांच्या 38 सभा तर डझनभर केंद्रीयमंत्री व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकून केलेल्या प्रचाराचं फलित आहे. शिवाय मोठ्या मनानं स्वतःचे प्रकल्प गुजरातला देऊन शेजारधर्म निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचंही योगदान विसरता येणार नाही”, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली आहे.