“गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन…”, मुख्यमंत्री बोम्मईंनी महाराष्ट्राला पुन्हा डिवचलं

नवी दिल्ली | Maharashtra Karnataka Border Dispute – महाविकास आघाडीच्या खासदारांनी शुक्रवारी (9 डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमध्ये सध्या सुरू असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत करण्यात आलेले विधान याबाबत तक्रार करण्यात आली. तसंच या भेटीनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत अमित शाह नक्कीम मार्ग काढतील असा विश्वास सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) व्यक्त केला आहे. तसंच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली आहे. त्यासाठी त्यांनी 14 डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलावलं असून त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. मात्र, अमित शाह यांनी दखल घेतल्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलंय.
“महाराष्ट्राच्या शिष्टमंडळानं केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतल्यानं काही फरक पडणार नाही. यापूर्वीही महाराष्ट्रानं असा प्रयत्न केला आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. सर्वोच्च न्यायालयात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचं सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही. कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाबाबत मी कर्नाटकच्या खासदारांना सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी कळवलं आहे. राज्याची कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांनाही भेटणार आहे”, असं बसवराज बोम्मई यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शुक्रवारी राज्यातील विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसदेतील कार्यालयात अमित शहांची भेट घेऊन सीमाभागांतील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेल्या अन्यायाचा मुद्दा मांडला. केंद्र सरकारनं तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणीही या खासदारांनी केली. गुजरातमध्ये 12 डिसेंबर रोजी नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार असून त्यानंतर दोन दिवसांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दिल्लीत चर्चा करू, असं आश्वासन शाह यांनी दिलं आहे.