“लो कर लो बात…”, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांवर टीकास्त्र

मुंबई | Chitra Wagh On Sanjay Raut – भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar) जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी राऊतांना खोचक शब्दांत टोला लगावलाय.
यावेळी चित्रा वाघ यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे की, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवताय?”
पुढे त्यांनी संजय राऊतांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. “लो कर लो बात…सर्वज्ञानी संजय राऊत म्हणत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान”, असा टोला चित्रा वाघ यांनी राऊतांना लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
“लोकशाहीमध्ये असं घडू नये पण दुर्दैवाने महाराष्ट्रात घडतंय. ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्यांनी लोकशाही जन्माला घातली त्या महाराष्ट्रात हे घडतंय दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं.” असं संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
2 Comments