महाविकास आघाडीच्या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी दिली परवानगी, ‘या’ अटींचं करावं लागणार पालन
मुंबई | Mahavikas Aghadi Mahamorcha – महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शनिवारी (17 डिसेंबर) राज्यातील विविध प्रश्नांवरुन मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. तसंच या मुंबईतील मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली आहे. हा मोर्चा शांततेत आणि नियमांचं पालन करुन काढावा असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. उद्याच्या मोर्चासाठी महाविकास आघाडीला पोलिसांनी काही अटींच्या आधारे परवानगी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली वादग्रस्त वक्तव्य आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मित्रपक्ष देखील सहभागी होणार आहेत. मात्र, या मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी काही अटींच्या आधारे मोर्चाला लेखी परवानगी दिली आहे.
पोलिसांनी काय अटी दिल्या आहेत?
मोर्चातील भाषणात कुठलंही आक्षेपार्ह वक्तव्य करू नये.
मोर्चाला मार्गदर्शन करताना दोन समाजात तेढ निर्माण होतील असं कोणतंही भाषण नेत्यांनी करू नये.
या मोर्चात आर्म अॅक्टनुसार चाकू, तलवार आणि इतर कोणतंही घातक शस्त्र वापरू नये.
मोर्चा दरम्यान कुठेही फटाके फोडू नये.
मोर्चा दिलेल्या मार्गानुसारच पुढे जायला हवा.
कायदा व सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही व सर्व नियमांचं पालन करावं अशा अटींच्या आधारे मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे.
मोर्चासाठी महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी
दरम्यान, उद्या महाविकास आघाडीकडून हल्लाबोल महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी तिन्ही पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स ॲंड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या संपूर्ण रस्त्यात तिन्ही पक्षांकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. तसंच पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील असणार आहे.
One Comment