“…तर आम्ही सभागृहात येणार नाही”, विधान परिषदेत चंद्रकांत पाटलांचा संतप्त इशारा

नागपूर | Chandrakant Patil – आजपासून (19 डिसेंबर) राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) सुरूवात झाली आहे. आजच्या या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी संतप्त इशारा दिला. सीमावादावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उभे राहिले असता उपसभापतींनी विरोधी बाकावरील सदस्याला बोलण्याची संधी दिली. त्यामुळे चंद्रकांत पाटील संतप्त झाले आणि ठरल्याप्रमाणे कामकाज होणार नसेल तर आम्ही सभागृहात येणार नाही, तुम्ही तुमच्या मनानं कामकाज चालवा, असा इशारा त्यांनी उपसभापतींना दिला.
विधान परिषदेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी कर्नाटक सीमावादाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या पाठीशी आहे असा विश्वास सरकारनं या सभागृहाच्या माध्यमातून द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे (Shashikant Shinde), जयंत पाटील (Jayant Patil) यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सरकारच्यावतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन करण्यास उठले असता विरोधी बाकावरून राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी बोलण्याची परवानगी मागितली. त्यांना परवानगी देऊ नका, अन्यथा आम्ही सुद्धा बोलू,असं सांगितलं. त्यानंतर खडसे बोलण्यासाठी उभे राहताच सत्ताधारी बाकावरून चंद्रकात पाटलांनी आक्षेप घेतला.
ठरल्याप्रमाणे या विषयावर फक्त विरोधीपक्ष नेतेच बोलणार होते. मात्र, आपण (उपसभापती) इतर दोघांना बोलण्याची परवानगी दिली. आता उपमुख्यमंत्री बोलण्यासाठी उभे राहिले असताना खडसे बोलणार असतील तर बरोबर नाही. ठरल्याप्रमाणे वागणार नसाल तर आम्ही सभागृहात येणार नाही, तुम्हाला वाटेल तसं कामकाज चालवा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यानंतर उपसभापतींनी खडसेंना बोलण्यास परवानगी नाकारली.